गुहागर, ता. 03 : तालुक्यातील वेळंब येथील ज्येष्ठ पत्रकार मारुती भिकाजी जाधव यांचे सोमवारी दि. २ जानेवारी रोजी मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते ६९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. Veteran journalist Maruti Jadhav No More
मारुती जाधव हे गुहागर तालुक्यातील जुने पत्रकार म्हणून ओळखले जातात. गेली अनेक वर्षे त्यांनी दैनिक सागरसाठी काम केले आहे. त्यानंतर दैनिक सकाळ, पुढारी या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी पत्रकारिता केली. त्यांची बातमीदारी ही अत्यंत अभ्यासू आणि बेधडक अशी होती. अनेक समस्या आणि जनतेसमोर न आलेले विषय त्यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्वांसमोर आणले. या प्रकारामुळे त्यांना काहीवेळा नागरिकांची नाराजीही सहन करावी लागली होती. चौफेर बातमी करण्याची हातोटी आणि प्रशासनालाही दखल घ्यावी लागेल अशी बातमीदारी यामुळे संपूर्ण तालुक्यात मारुती जाधव परिचित होते. त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व होते. Veteran journalist Maruti Jadhav No More
पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्यातहि त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. वेळंब ग्रामपंचायतीचे गेली अनेक वर्षे ते सरपंच राहिले आहेत. तालुका सहकारी संघाचे सरचिटणीस, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पद भूषविले आहे. शिवाय विविध सामाजिक संघटनांवर ते पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. मारुती जाधव हे कोरोना काळात ते आजारी पडले होते. त्यातून ते बरे होऊन आपल्या घरी आले होते. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून ते पुन्हा आजारी पडल्याने त्यांना मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. याच ठिकाणी त्यांचे सोमवारी दि. २ जानेवारी रोजी पहाटे निधन झाले. Veteran journalist Maruti Jadhav No More