संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 21 : तालुक्यातील आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोली आणि कोकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या प्रात्यक्षिकावर आधारित हळद लागवड प्रशिक्षण गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोली येथे नुकतेच उत्साहात संपन्न झाले. या प्रशिक्षणामध्ये मुंबई, रायगड, रत्नागिरी, कणकवली या ठिकाणाहून ३२ शेतकरी प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे शेतकरी महिलाही या प्रशिक्षणामध्ये सहभागी झाल्या होत्या. Turmeric Cultivation Training in Aabloli
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये एसके – ४ या हळदीच्या बियाणाचे प्रणेते आणि निर्माते सचिन कारेकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करुन हळदीचा मातृकंद, कन्याकंद, हळकुंड यांची लागवड कोणत्या महिन्यात कशी करावी आणि काय टाळावे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व प्रशिक्षणार्थींना शेतात नेऊन वाफे कसे काढावेत, हळद कशी लावावी, कालांतराने मातीची भर कशी द्यावी, लावलेली हळद कशी काढावी, केव्हा काढावी, ती उकळत्या पाण्यातून काढून नंतर कशी वाळवायची, त्याची पावडर कशी करावी, त्याच संगोपन करताना कंदाची, पावडरची जपवणूक कशी करावी, हळदीला बाजारपेठ कुठे उपलब्ध आहे. याबाबतचे सर्व मार्गदर्शन केले. तसेच हळदीची रोपे कशी तयार करावीत याबाबतचे प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन गुहागरचे कृषी विस्तार अधिकारी श्री.गजेंद्र पौनीकर यांनी केले. Turmeric Cultivation Training in Aabloli
या प्रशिक्षणाच्या वेळी आत्ता पर्यंत ज्या – ज्या शेतकऱ्यांनी हळद लागवड केली. त्यांचे मोठमोठे गड्डे तेथे प्रदर्शनात ठेवले होते. तसेच हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी व मागणी आणि पुरवठा यांचे गणित जमावे म्हणून शेतक-यांना बियाणं देऊन हळदीचे पीक घेण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे. त्यासाठी एसके – ४ ग्रुप तर्फे काही स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. विविध ठिकाणच्या १५ शेतक-यांचा त्यावेळी बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला. या स्पर्धेमध्ये सर्वात मोठा हळदीचा गड्डा आणणारे गुहागर तालुक्यातील जानवळे येथील अशोक राघो रहाटे यांना २.६०० किलो वजनाचा हळदीचा गड्डा काढल्यामुळे त्यांना प्रथम क्रमांकाचे ५५५५/- रुपये बक्षिस देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ.मिनल ओक यांनी कृषी पर्यटन संस्थेच्या उपक्रमांची माहिती देऊन कृषी पर्यटनाची गरज विषद केली. Turmeric Cultivation Training in Aabloli
या कार्यक्रमात गुहागर पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, चिपळूण पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी बी.बी.पाटील, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी व प्रशिद्ध उद्योजक आणि गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोलीचे मालक व कृषी तज्ञ सचिन कारेकर, कृषी अधिकारी धायगुडे, संगमेश्वरचे सहाय्यक गटविकास अधिकारी तथा कृषी अधिकारी विनोदकुमार शिंदे, कोकण भूमी कृषी पर्यटन सह.संस्था कोकण प्रांत अध्यक्ष प्रा.डॉ.मिनल ओक, पर्यटन संस्थेचे सचिव अमोल लोन, संचालक नंदादिप पालशेतकर आदी.मान्यवर उपस्थित होते. राई कृषी पर्यटन केंद्र गोळवलीचे संचालक आणि संस्थेचे सचिव अमोल लोध यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. Turmeric Cultivation Training in Aabloli