एसटी रिकामी तर ट्रॅव्हल्स फुल ; गुहागरची स्थिती
गुहागर, ता.30 : दोन वर्षांनंतर गावी गणेश उत्सवासाठी मोठ्या संख्येने येत असलेल्या गणेश भक्तांना परत आपल्या ठिकाणी जाण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्सवाले प्रचंड भाडे आकारीत आहेत. हि गणेश भक्तांसाठी लूट सुरू झाली आहे. गुहागर ते मुंबई, पुणे जाणारे प्रवासी या लुटीमुळे हतबल झाले आहेत. गुहागरहून एस.टी. पेक्षा तिप्पट पैसे हे चाकरमानी नाईलाजाने मोजत असून खाजगी ट्रॅव्हलवाल्यांची जणू दिवाळीच सुरु आहे. Triple fares for private travels


या गणेश उत्सव काळात गावी येणाऱ्या चाकरमान्यांना परत जाण्यासाठी काही ट्रॅव्हल्सवाल्यांनी ९०० रुपये काहींनी 1000 तर काहींची मजल 1200 ते 1500 हजारापर्यंत गेली आहे. वेगवेगळ्या खाजगी मालकांच्या सुमारे १५ ते २० गाडया दररोज गुहागरच्या विविध भागातून सुटत आहेत. शृंगारतळीची बाजारपेठ या गाड्याचे मोठे स्टँडच झाले आहे.
या उलट महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या गुहागर – ठाणे, पुणे व मुंबई उपनगरात जाण्यासाठी बसेस आहेत. परंतु, गुहागर तालुक्यातील प्रवाशांच्या एसटीची लालपरी डोक्यात बसली असल्याचे स्पष्ट होत आहे. या लालडब्यांच्या जागी आरामदायी बसेस आल्या आहेत. एसी, नॉन एसी व विठाई सारख्या अनेक बसेस गुहागरातून सुटत आहेत. या गाड्यांचे तिकीटही पाचशे पेक्षा जास्त नाही. शिवाय जेष्ठ नागरिक, लहान मुले यांना प्रवासात सवलत आहे. तरीही लोकांची मानसिकता बदलेली नाही. किंवा एसटी अधिका-यांनी ती बदलण्यासाठी तसदी घेतलेली नाही. म्हणून एसटी रिकामी तर ट्रॅव्हल्स फुल अशी गुहागरची स्थिती आहे. Triple fares for private travels


कोरोना काळानंतर सुमारे दोन वर्षानंतर या गणेशोत्सवाला चाकरमानी मोठ्या संख्येने येत आहेत. रेल्वेने येणे गुहागर तालुक्यातील प्रवाशांना सुलभ वाटत नाही. मुंबई पुण्यातून आपल्या घरी सणासुदीला येताना प्रत्येका जवळ बऱ्यापैकी सामान असते. ते गुहागरला येताना अनेक वाहने बदलावी लागतात. त्यामुळे गुहागर तालुक्यातील प्रवासी आपल्या गावात थेट येण्याचा मार्ग स्विकारतात. सद्या तालुक्यातील बहुसंख्य गावातून अशा खाजगी ट्रॅव्हल्स सुटतात. सायंकाळी घरात जेवण करून निघालेला प्रवासी पहाटे मुंबईत थेट विरारला पोचतो. सकाळी उठून आपला कामधंदा वा नोकरी गाठणे त्याला सहज शक्य होते. शिवाय रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रास न होता ट्रॅव्हल्सवल्याच्या पुशबॅकमुळे आरामदायी प्रवास होतो. मात्र, गुहागर तालुक्यातील खेडेगावच्या अशा प्रवाशांची एसटी पेक्षा ट्रव्हल्सला असलेली पसंती लक्षात घेऊन त्यांनी सिझनला प्रवाशांच्या खिशाला चांगलीच कात्री लावली आहे. Triple fares for private travels