हेदवीतील रेशन दुकानदार विवेक जोगळेकर यांचे निधन
गुहागर, ता. 11 : असं म्हणतात की माणुस किती महान होता ते त्यांच्या अंत्ययात्रेला जमलेल्या गर्दीवरुन कळते. 5 डिसेंबरला हेदवीतील रेशनदुकानदार विवेक जोगळेकर यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला हेदवी पंचक्रोशीतील सर्वसामान्यांसह, गुहागर तालुक्यातील अनेक प्रशासकीय अधिकारी, रेशन दुकानदार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावरुन एका सामान्य कुटुंबातील रेशनदुकानदाराचे असामान्यत्व समजते. म्हणूनच किर्तनकार डॉ. श्रीपाद जोगळेकर यांनी नेता नसलेल्या नेत्याला भगवंत ने ता झाला असे म्हटले. Tribute to Vivek Joglekar
हेदवीतील रेशन दुकानदार, लक्ष्मी नारायण भजन मंडळाचे बुवा विवेक जोगळेकर यांचे वयाच्या 70 व्या वर्षी 5 डिसेंबरला सकाळी 6.30 च्या दरम्यान निधन झाले. गेले तीन महिने ते आजारी होते. हेदवीमध्ये एकत्र कुटुंबात रहाणाऱ्या विवेक जोगळेकर यांच्या पश्र्चात पत्नी, दोन मुलगे, एक सुन, नातू तसेच काकु, सख्खा भाऊ, भावजय, असा मोठा परीवार आहे. रेशन दुकानातील धान्य संपले तर स्वत:च्या घरातील धान्य देणारे, गुहागरला येताना सोबत अनेकांची कामे घेवून येणारे, भजनाची आवड असलेले उत्तम बुवा, सर्वांशी सौजन्याने वागणारे असे हे व्यक्तीमत्त्व. Tribute to Vivek Joglekar
विवेक जोगळेकर यांना श्रध्दांजली वाहताना किर्तनकार, डॉ. श्रीपाद जोगळेकर लिहितात की,अजातशत्रू, प्रगल्भ, आयुष्यात कधीही, कुणाशीही भांडण नाही. अर्वाच्य शब्द मुखातून कधीही नाही. असं हे उत्तुंग व्यक्तीमत्व. आयुष्यात कोणतंही शास्त्रीय संगीत शिक्षण न घेता, फक्त तपश्चर्येच्या बळावर सुरांना आळवणारा आणि खेचून आणणारा निस्सीम भजनप्रेमी तानसेन. पण संगीताच्या बाहेर कधीही तारसप्तक माहित नसलेला राजबिंडा आमचा विवेकदादा. जीवनभर रेशन दुकान इमानदारीने सांभाळले. मनुष्य रूपी धन खुप जमविले, सगळ्या थरातील, सगळ्यांशी मैत्रीपूर्ण, सौहार्द संबंध ठेवले. कायद्याने चूक असेल तरीही रेशन न्यायला आलेल्या माणसाला सही जुळत नाही किंवा अंगठा जुळत नाही म्हणून कधीच विन्मुख नाही पाठवले. थोडं कायद्याच्या कक्षेत न राहता, माणुसकीचा कायदा हातात घेऊन त्या माणसाला काही ना काही धान्य मिळणारच. आणि मुख्य म्हणजे हा विश्वास त्यांनी स्वतःच्या वागणुकीतून निर्माण केला. रेशनचा भरणा करायला जाताना त्या कागदपत्रांशिवाय त्यांच्या झोळीत अन्यही असंख्य महत्वाची कागदपत्रे असायची, पण ती लोकांची. त्या संबंधित माणसाची फेरी वाचावी आणि वेळ पडल्यास स्वतःचं थोडं वजन किंवा तिथली असणारी माहिती वापरावी आणि त्या माणसाचं काम विनामोबदला करून द्यावं. तेही कोणतंही राजकीय पद किंवा पाठिंबा नसताना. विवेकदादाला एक बहुआयामी, बहुउद्देशीय, बहुपयोगी कंपनीच म्हटलं तरी ती अतीशयोक्ती होणार नाही. देवस्थान संस्थांची कागदपत्रीय कामे ते अत्यंत आवडीने करायचेच. वेळप्रसंगी स्वतः हातात झाडू घेऊन शेणाचं सारवण घालताना देखिल त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही. कोणत्याही प्रकारचे मादक व्यसन त्यांनी केलेलं नाहीच पण पाहिलेलंही नाही. भातशेती, गुरंढोरं यांचा सांभाळ त्यांनी खुप प्रेमाने केला. कोणताही उत्सव असो त्यांच्यात एक वेगळाच संचार व्हायचा. आत्ता देखील श्री लक्ष्मीनारायण उत्सव सुरू होता. त्यांची एक किमोथेरपी झालेली होती, जी त्यांना झेपली नव्हती. तरीही दुसऱ्या किमोथेरपीला मध्ये वेळ असल्याने ते हट्टाने उत्सवात सहभागी होता यावं किंवा निदान देवदर्शन तरी व्हावं या हेतूनं ६ तासांचा प्रवास करून हेदवीच्या घरी आले होते. भजनप्रेमापोटी गावात बंद पडलेली भजनसंस्था त्याने गोपाळ जमवून, स्वतः ची पदरमोड करुन ऊर्जितावस्थेत आणली. जिल्हा स्तरावर स्पर्धेत भजनाला पहिला क्रमांक प्राप्त झाला त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वहात असलेला पहायला मिळाला होता. जो आवडतो सर्वाला, तोची आवडे देवाला हे परमेश्वराने पुन्हा एकदा सिद्ध केले. सर्वांचा नेता नसलेल्या नेत्याला भगवंत नेsssता झाला. विनासंबोधन विवेक दादा आम्हा सर्वांना पोरके करून त्या जगन्नियंत्याच्या दरबारात भजन गायला निघून गेले. Tribute to Vivek Joglekar
मिलींद पाटेकर यांनी श्रद्धांजली वाहनाता म्हटले की, एका महान व्यक्तीचे निधन झाले आणि त्यांच्या अंतिम दर्शनाला होणारी गर्दी त्यांनी आयुष्यात इतरांना केलेल्या मदतीची आणि इतर लोकांबरोबर असणारे संबंध आणि त्यांच्या बरोबर असणारे वागण याची पोचपावती मिळाली. त्यांच्या दुकानदारी व रेशन दुकान या माध्यमातून अनेक लोकांना प्रामुख्याने गोर गरीब लोकांना मदतीचा हात पुढे केला आणि त्यांची चूल पेटवली. रेशन संपलं असताना देखील अनेक लोकांना आपलं घरच धान्य देऊन त्यांनाही समाधानी केल. आज मलाही आठवतंय की, काही वर्षांपूर्वी आमची ही परीस्थिती अगदी हलाखीची होती त्यावेळी याच देव माणसाने उधारी किंवा रेशन दुकानाच्या माध्यमातून आमचीही चूल पेटवली होती. जरी आज आम्ही चार घास खाऊन सुखी असलो तरी त्याचे ते उपकार माझ्यासारख्या अनेक माणसांवर न फिटणारे कर्जं आहे. Tribute to Vivek Joglekar