जिल्हा न्यायाधीश एस. एस. गोसावी
रत्नागिरी, ता. 09 : बार आणि बेंच यामधील संबंध सौहार्दपूर्ण राहतील असा आपण प्रयत्न करूया. बारसाठी प्रशस्त हॉलची मागणी आपण मार्गी लावण्यासाठी सकारात्मक आहोत. बारमधून नवे ” रामशास्त्री ” निर्माण होतील यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. नवीन वकीलासाठी प्रशिक्षण वर्कशॉप घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रधान जिल्हा न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी रत्नागिरी बार असोसिएशन निवडणुकीनंतर नवीन पदाधिकारी यांच्या पदग्रहण समारंभात केले. Training requirement for new lawyers

न्या. रामशास्त्री आणि न्या. एच. आर. खन्ना यांनी दाखविलेले धैर्य अतुलनीय होते. धैर्य म्हणजे भीतीचा अभाव नसतो तर भीतीवर मिळवलेला निर्विवाद विजय असतो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतरत्न डॉ. पा. वा. काणे यांचा वारसा आपल्यासमोर आदर्श म्हणून आहे. न्या. मंचरजी खारेघाट यांनी प्रत्येक टप्प्यावर सत्याचा शोध घेतला आणि माणुसकीचा धर्म जोपासला. सम्राट अशोकाची राजधानी सारनाथ येथून घेतलेले सिंहशिल्प व अशोकचक्र आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे सिल आहे, तर ” यतो धर्मस्ततो जया” हे ध्येयवाक्य आहे. जेथे धर्म तेथे विजय या विचारावर आपल्याला चालावे लागेल, असे प्रतिपादन अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी केले. Training requirement for new lawyers
