गुहागर, ता. 19 : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी सावध राहावं, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. अशातच रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. रायगड हद्दीतील आंबेनळी घाटात मंगळवारी रात्रीच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. Traffic stopped due to landslide in Ambenli Ghat

रायगडच्या आंबेनळी घाटात चिरेखिंडी येथे ही दरड कोसळल्याने महाबळेश्वरहून पोलादपूरकडे आणि पोलादपूर होऊन महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुसळधार पाऊस आणि रात्रीची वेळ असल्याने आता ही दरड हटवली जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, आंबेनळी घाटातून प्रवास न करण्याचे पोलादपूर तहसीलदारांनी आवाहन केले आहे. सततच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दरड कोसळल्याची घटना घडली होती. येत्या चार ते पाच दिवसांत कोकणासह रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सततच्या पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने घाटमाथ्यावर वाहनचालकांनी सतर्कतेने प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. Traffic stopped due to landslide in Ambenli Ghat

