रत्नागिरी, ता. 14 : गेल्या वर्षाप्रमाणेच हर घर तिरंगा अभियान सुरू आहे. या अभियानाअंतर्गत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रविवारी रत्नागिरी शहरात सायकल रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला उदंड प्रतिसाद लाभला. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. साधारण बारा किलोमीटरच्या मार्गावर रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली. यामध्ये सुमारे ११० सायकलपट्टू सहभागी झाले. रॅलीकरिता जिल्हा प्रशासन, शहर व वाहतूक पोलिसांचे सहकार्य लाभले. Tiranga Rally in Ratnagiri

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगतेनिमित्त रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षीसुद्धा भर पावसात या सायकल रॅलीला आबालवृद्धांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानुसार याही वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि रॅली यशस्वी झाली. Tiranga Rally in Ratnagiri

रॅलीतील सहभागी काही सायकलस्वारांनी सायकलला तिरंगा राष्ट्रध्वज लावला होता. तिरंगा ध्वजाचा अवमान होणार नाही, याची खबरदारी सर्व स्वारांनी घेतली. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचा दर महिन्याला काही ना काही उपक्रम सुरू आहे. त्यामुळे सध्या १७५ हून अधिक सायकलपट्टू या क्लबला जोडले गेले आहेत. यामध्ये डॉक्टर, वकील, पोलिस, हॉटेल व्यावसायिक, पत्रकार, विद्यार्थी, अभियंते, नोकरदार आणि महिला यांचा समावेश आहे. यापूर्वी रत्नागिरीत जिल्हा सायकल संमेलनाचे यशस्वी आयोजन केल्यामुळे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबकडे अनेक सायकलपट्टूंचा ओढा आहे. Tiranga Rally in Ratnagiri

तिरंगा सायकल रॅली सकाळी ८ वाजता मारुती मंदिर येथून सुरू झाली. त्यानंतर नाचणे रोड, साळवी स्टॉप, मारुती मंदिर, माळनाका, जयस्तंभ, रामआळी, गाडीतळ, टिळक आळी, बंदररोड आठवडा बाजारमार्गे जयस्तंभापर्यंत रॅली काढली. रॅलीच्या मार्गावर घोषणा देण्यात आल्या. अनेक नागरिकांनीही यामध्ये सहभाग घेत भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. नाक्यानाक्यावर शहर आणि वाहतूक पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. या रॅलीमध्ये ८ वर्षांपासून अगदी ७० वयापर्यंतचे ज्येष्ठ नागरिकही रॅलीमध्ये सहभागी झाल्याने रॅली यशस्वी झाली. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, पोलिस निरीक्षक, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, यांचे रॅलीकरिता सहकार्य लाभल्याबद्दल क्लबतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले. Tiranga Rally in Ratnagiri

