गुहागर नाका ते विश्रामगृह मार्गाची झालेली दुरावस्था
गुहागर, ता. 20 : गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर नाका ते शासकीय विश्रामगृह मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत. नागरिकांना दुरावस्था झालेल्या रस्त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतं आहे. याबाबत येथील नागरिकांनी बांधकाम मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार व राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पत्रव्यवहार करून सुद्धा आजपर्यंत कोणतीच दखल घेतली गेली नाही. या त्रासाला कंटाळून संतप्त नागरिकांनी दि. 23 मे रोजी गुहागर शहरातील जुने मच्छि मार्केट येथे ठिय्या आंदोलन करणार आहेत. याबाबत निवेदन गुहागर तहसील कार्यालयात देण्यात आले. Thiya agitation of Guhagar citizens


या निवेदनात म्हटले आहे की, गुहागर नाका ते रेस्ट हाऊस या महामार्गांचे लांबीमध्ये पुर्णपणे खड्डे पडले असून सदर खड्डयांमध्ये नागरीकांना खुप त्रास होत आहे. वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सदर खड्डयांमुळे किरकोळ स्वरुपाचे अपघात ही झाले आहेत. सर्व राजकीय पक्षातील नागरिकांनी आपल्याला पत्रव्यवहार केला आहे. पंरतू पत्रव्यवहार व्यतिरीक्त ठोस कारवाई होत नाही. पावसाळा तोंडावर आला आहे. याप्रकारचा निषेध म्हणून दि. 23 रोजी सकाळी 10 वाजता ठिय्या आंदोलन करणार आहोत. त्यामुळे होणाऱ्या परिस्थितीला आम्ही जबाबदार राहणार नाही, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. Thiya agitation of Guhagar citizens
दरम्यान, हे निवेदन देतेवेळी राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता खुणेकर उपस्थित होते. संतप्त नागरिकांनी त्यांना टार्गेट केले. तुम्ही मरणाची वाट पाहत आहात का, असे असेल तर सांगा. प्रत्येकवेळी तारखा देवून वेळ मारून नेता. आज झालेल्या लोकशाही दिनात तुम्ही चार दिवसात कामं करून देतो म्हणून, पण तुम्हाला अधिकार आहे का शब्द देण्याचा. तुम्हाला जमत नसेल तर शब्द देऊ नका. काही दिवसांपूर्वी खड्डे बुजवण्यासाठी 13 लाख रुपये खर्च केले गेले. पुन्हा खड्डे पडले. तुम्ही पैसे खर्च करता मग कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही चुका करायच्या आणि त्याचा जाब विचारायला गेल्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हे दाखल करायचे, हेच तुमचे कामं असून तुम्ही एक नंबरचे खोटारडे अधिकारी आहात, अशा शब्दात दीपक परचुरे, अमरदीप परचुरे, दीपक कनगुटकर, निलेश मोरे, नरेश पवार, दीपक शिरधनकर यांनी समाचार घेतला. Thiya agitation of Guhagar citizens


यावेळी पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांची भेट घेत ठिय्या आंदोलनाची माहिती दिली. यावेळी श्री. सावंत यांनी राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता खुणेकर यांना वरिष्ठाना फोन लावण्यास सांगून इथल्या परिस्थितीची माहिती देण्यास सांगितली. मुख्य अभियंता श्री. शेलार व कार्यकारी अभियंता श्री. घाडगे यांना पोलीस निरीक्षक सावंत यांनी फोनवरून या रस्त्याबाबत त्वरित बैठक लावण्यास सांगितले. परंतु, नागरिकांनी आपल्या ठिय्या आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्धार केला. यावेळी साहिल आरेकर, सुबोध देवकर, संतोष सांगळे, शार्दूल भावे, सिद्धेश आरेकर, हर्ष बागकर आदी उपस्थित होते. Thiya agitation of Guhagar citizens