रत्नागिरी, ता. 17 : भारत शिक्षण मंडळाच्या कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरातील इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी संकल्प दिनानिमित्त विविध संकल्प केले आहेत. सकाळी लवकर उठणे, देवाला, वडिलधाऱ्यांना नमस्कार करणे, सूर्यमंत्राचे पठण, समंत्र सूर्यनमस्कार, शालेय अभ्यास, चांगला आहार, पानात वाढलेले सर्व पदार्थ आवडीने खाईन, चांगले तेच बोलेन, समाजातील दीन-दुबळे, दिव्यांगांना मदत करीन, वृक्षवेलींचे संवर्धन करीन आदी संकल्प यावेळी विद्यार्थ्यांनी केले. जागुष्टे हायस्कूलच्या निवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती गायत्री खाडिलकर यांच्या उपस्थितीत संकल्प दिन कार्यक्रम झाला. The Students made a resolution
सुरूवातीला विद्यार्थिनींनी आचार्य गायत्री खाडीकर यांचे पूजन केले. सर्व विद्यार्थ्यांनी संकल्प गीत सादर केले. संकल्पाचे उच्चारण सौ. गीता सावंत यांनी विद्यार्थ्यांकडून करवून घेतले होते. त्यानंतर श्रीमती खाडीलकर यांनी सूर्यमंत्र व समूहमंत्राचे उच्चारण करून स्पष्टीकरण केले. श्रीमती गायत्री खाडिलकर यांनी सांगितले की, कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी निसर्गाला गुरू मानून पूजन केले हा स्तुत्य उपक्रम आहे. संकल्प केल्यामुळे लहान वयातच चांगली शिस्त लागते. शाळा व संस्थेने हा चांगला उपक्रम राबवला आहे. चांगले आचरण करण्याचा संकल्प करायचा आहे. मोबाइलचा वापर मर्यादित करा, डब्यातला खाऊ सर्व खा, हवं ते आणि हवं तेव्हा मिळायला हवे असे वाटते, ही वृत्ती कमी झाली पाहिजे. The Students made a resolution
मुग्धा पोखरणकर हिने मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मीसुद्धा येथे शाळेत असताना संकल्प दिन कार्यक्रमात अनेक संकल्प केले. आणि त्यातील बहुतांशी संकल्प मनापासून पाळले व आजही अमलात आणत आहे. अभ्यास मन लावून केला. सतत अभ्यास करण्याचा आनंद मिळतो व परीक्षेला सामोरे जाताना दडपण येत नाही. सूर्यनमस्कारांमुळे मन खंबीर झाले. The Students made a resolution
या कार्यक्रमानंतर लहान पाल्याशी पालकांनी कसे वागावे, कोणत्या चांगल्या सवयी लावाव्यात, याबाबत श्रीमती खाडिलकर यांनी पालकांशी संवाद साधला. या वेळी सौ. बडे यांनी पालक म्हणून अनुभव कथन केले. कार्यक्रमात मान्यवरांना पालक व विद्यार्थ्यांनी साकारलेले पुष्पगुच्छ देण्यात आले. सौ. प्रीती देवरुखकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम यांनी पाहुण्यांचा परिचय, कार्यक्रमाविषयी माहिती दिली. सुधीर शिंदे यांनी आभार मानले. The Students made a resolution
या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रबंधक विनायक हातखंबकर, मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम, शाळा समिती सदस्य राजेंद्र कदम, अनंत आगाशे, सतीश दळी, चंद्रकांत घवाळी, आयसर संस्थेत निवड झालेली माजी विद्यार्थीनी मुग्धा पोखरणकर व्यासपीठावर उपस्थित होते. The Students made a resolution