श्रीमंत पेशव्यांनी चौथऱ्यावर भरली खणानारळांने ओटी
मयूरेश पाटणकर, गुहागर
गुहागर, ता. 06 : आनंदीबाई रघुनाथराव या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी चिपळूणपर्यंत आलेल्या श्रीमंत पेशवा कुटुंबाने आनंदीबाईंच्या माहेरच्या गावाला मळणला भेट दिली. या भेटीत त्यांनी आनंदीबाईंच्या घराच्या चौथऱ्यावर जावून खणानारळाने ओटी भरली. सुंदर तळे, हरिहरेश्र्वर मंदिर आणि गुहागरमधील आनंदीबाईचे देवघर (सध्याचे बांधकाम विभागाचे कार्यालय) पाहीले. या प्रवासामुळे कृतकृत्य झाल्याची प्रतिक्रिया श्रीमंत पेशवे पुष्करसींह यांनी दिली. The Peshwa family visited Anandibai’s village
चिपळूणला शनिवारी (ता. 3) सायंकाळी सौ. नीला नातू यांनी लिहिलेल्या आनंदीबाई रघुनाथराव या पुस्तकाचे प्रकाशन श्रीमंत पेशवा पुष्करसींह यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर रविवारी (ता. 04) श्रीमतं पेशवा पुष्करसींह, त्यांच्या पत्नी आरतीदेवी पेशवा, बहिण सौ. आदितीदेवी पेशवा अत्रे, इतिहास तज्ज्ञ महेश तेंडुलकर आदींनी मळण गावाला भेट दिली. मळणला आनंदीबाईंच्या माहेरच्या घराचा चौथरा आहे. पेशवे येणार म्हणून मळणचे सरपंच नारायण गुरव यांनी चौथऱ्याची तसेच परिसराची स्वच्छता केली होती. हा चौथरा आणि परिसरात कोणीही गेल्यास त्याला बाधा होते. या समजामुळे या चौथऱ्याच्या परिसरात जाण्याचे धाडस कोणीही करत नाही. या पार्श्र्वभुमीवर सरपंचांनी स्वखर्चाने चौथऱ्याची साफसफाई केल्याचे सुमंत भिडे यांनी पेशवा कुटुंबाला सांगितले. त्यामुळे आधीच भावनिक झालेल्या पुष्करसींह यांनी नारायण गुरव यांचे आभार मानले. जुन्या काळात या घरासमोरुन वाकून जाण्याची पध्दत असल्याने श्रीमंत पेशव्यांच्या या कृतीने सारेजण भारावून गेले. पेशवा कुटुंब आनंदीबाईंच्या चौथऱ्यावर नतमस्तक झाले. सौ. आरतीदेवी व सौ. आदितीदेवी पेशवे अत्रे यांनी खणा नारळाने चौथऱ्यावर ओटी भरली. सर्वांनी चौथऱ्याच्या परिसरातील आडाची पहाणी केली. यावेळी सरपंच नारायण गुरव यांनी हा चौथरा पहाण्यासाठी अनेक पर्यटक इथे येतात. त्यामुळे या ठिकाणी पेशव्यांचा इतिहास सांगणारी वास्तू उभी करावी. ग्रामपंचायत सर्वतोपरी साह्य करेल. अशी विनंती श्रीमंत पेशवा पुष्करसींह यांना केली. The Peshwa family visited Anandibai’s village
चौथऱ्याच्या दर्शनानंतर पेशवा कुटुंबाने श्रृंगार तळ्याला भेट दिली. आनंदीबाई माहेरी यायच्या त्यावेळी याच परिसरात त्यांच्या लवाजमा उतरत असे. या तळ्याच्या एका बाजुला हत्ती, घोडे यांना पाणी पिण्यासाठी खाली उतरता येईल अशी व्यवस्था आहे. तर दुसऱ्या बाजुला स्नान केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी दगडी आडोसा आहे. त्याची माहिती सरपंच गुरव यांनी दिली. येथील पहाणी केल्यानंतर मळणमधील हरिहरेश्र्वराच्या मंदिरात जावून पेशवा कुटुंबाने दर्शन घेतले. याठिकाणी छोटासा सत्कारचा कार्यक्रम गावकऱ्यांनी केला. हा कार्यक्रम संपल्यावर सर्वजण गुहागरमधील आनंदीबाईच्या देवघराची भेट घेण्यासाठी गेले. व्याडेश्र्वर दर्शनासाठी येण्यापूर्वी समुद्रस्नानाची रित जुन्या काळात होती. हे समुद्रस्नान आटपल्यावर आपल्यासोबत आणलेल्या देवांची पूजा या ठिकाणी आनंदीबाई करत असल्याचे सांगितले जाते. मात्र या वास्तूत सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कार्यालय आहे. या खात्याने जुन्या काळातील आठवण म्हणून येथे असलेले कोरीव खांब तसेच ठेवले आहेत. या खांबांवरील नक्षीची हेमांड पंथीय बांधकामाशी असलेले नाते यावेळी इतिहासतज्ञ मंगेश तेंडूलकर यांनी सर्वांना सांगितले. The Peshwa family visited Anandibai’s village
या दौऱ्याबाबत बोलताना श्रीमंत पेशवा पुष्करसींह म्हणाले की, आजही मळण गावात आनंदीबाई, पेशवा कुटुंब याविषयी असलेले प्रेम पाहून भरुन आले. यापूर्वी कुलदैवत म्हणून व्याडेश्र्वर मंदिरात अनेकवेळा आलो होतो. मात्र मळणपर्यंत पोचता आले नव्हते. नीला नातूंनी लिहिलेल्या पुस्तकामुळे आनंदीबाईंचा सकारात्मक इतिहास, मळणमधील घराचा चौथरा, श्रृंगार तळे, हरिहरेश्र्वर या सर्वांचे दर्शनाने कृतकृत्य झालो आहोत. The Peshwa family visited Anandibai’s village