खासदार तटकरे ; आढावा सभेत जाहीर भाषणातून प्रेमाचा सल्ला
गुहागर, ता. 25 : येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत खासदार सुनील तटकरे यांनी राजेश बेंडल यांना जाहीररीत्या पक्षप्रवेश करण्याचा सल्ला दिला. पुढच्या 8-15 दिवसांत मुंबईला या आणि अजितदादांच्या हस्ते राष्ट्रवादीचा मफलर गळ्यात घाला. असे प्रतिपादन तटकरेंनी केल्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. आमदार भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना राजेश बेंडल यांचे आणि आमदार जाधव यांच्यात विसंवाद निर्माण झाला. त्यातून दोघेही दूर गेले. अखेर गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळी राजेश बेंडल यांनी शहर विकास आघाडीद्वारे वेगळी चूल मांडली. शिवसेनेला सोबत घेतले. आमदार जाधव यांनी उभ्या केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांपैकी केवळ एक नगरसेविका निवडून आली. तेव्हापासून आमदार भास्कर जाधव आणि राजेश बेंडल यांच्यात मोठा दुरावा निर्माण झाला.
पुढे विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमदार भास्कर जाधव शिवसेनेत गेले. त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक कामाला बसणे स्वाभाविकच होते. अशा नकारात्मक वातावरणात देखील सकारात्मक ऊर्जा घेऊन येथील कार्यकर्ते राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी धडपडत आहेत.
राजेश बेंडल 25 वर्ष राजकारणात आणि समाजाच्या संघटनांमध्ये सक्रिय आहेत. त्यांना तालुक्यातील राजकीय व सामाजिक प्रवाहांची माहिती आहे. त्यांचे नेतृत्व मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे. स्वाभाविकपणे राजेश बेंडल क्रियाशील झाले तर त्याचा फायदा राष्ट्रवादीला होणार आहे. म्हणूनच शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष असलेल्या राजेश बेंडल यांनी राष्ट्रवादीमध्ये सक्रिय व्हावे अशी पहिल्यापासून कार्यकर्त्यांची आग्रही अपेक्षा आहे. ही अपेक्षा अनेकवेळा या कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे बोलूनही दाखवली आहे.
राजेश बेंडल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. जिल्हा परिषद गटांच्या बैठकांमध्ये, राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत बैठकांमध्येही त्यांची उपस्थिती असते. मात्र थेट पक्षाची जबाबदारी त्यांनी घेतलेली नाही. म्हणूनच वेगवेगळ्या पद्धतीने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी कधी आग्रहाने, कधी प्रेमाने, राजेश बेंडल यांना पक्षाच्या संघटनात्मक कामामध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत करण्यासाठी धडपडत आहेत.
आज खासदार सुनील तटकरे यांनी देखील जाहीर भाषणातून हीच भूमिका अधिक आग्रहाने मांडली. तटकरे म्हणाले की, आज बर्याच दिवसांनी, बर्याच महिन्यांनी मी इथे आलो तर, राजेश बेंडल राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर आहेत. तुम्ही इकडे तिकडे कुठे गेला होतात ते तुमचं तुम्हाला माहिती. मी काही बोलत नाही. पण आता मात्र नीर्वाणीच तुम्हाला सांगतो, सहा सात दिवसांत मुंबईला या, अजितदादांच्या हातून राष्ट्रवादीचा मफलर गळ्यात घाला आणि कामाला लागा. समज गैरसमज बाजूला ठेवून पक्ष म्हणून एकत्र येवूया. एक पक्ष म्हणून बांधणी करण्यासाठी आपण सर्वांनी एका प्रवाहात काम करण्यास सुरवात केली की समज गैरसमज सगळे वाहून जातात. नव्याने कामात येणार्यांना, काठावर काम करणार्यांनाही लक्षात येत की आपण सर्वजण सामुदायिकरीत्या एका पक्षाच्या प्रवाहात काम करत आहोत. एका राष्ट्रीय पक्षाचे पाठबळ आपल्याला मिळते. त्यामुळे मागे काय झाले ते विसरून आपण लवकरच सक्रिय व्हावे.
हा आत्मीयतेचा सल्ला – राजेश बेंडल
विधानसभेच्या निवडणुकीनंतर कोणतेही पद नसताना मी राष्ट्रवादीच काम करत आहेत. आज सुनील तटकरे केवळ खासदार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेले आमचे नेते आहेत. मी पदावर नसताना देखील उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते अजितदादा यांची भेट घेण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे. यात त्यांचा काही वेगळा दृष्टिकोन असू शकतो.
संबंधित बातम्या वाचण्यासाठी खालील हेडिंगवर क्लिक करा.
प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी
हिवाळी अधिवेशनापर्यंत गुहागर सीआरझेड वर्ग २ मध्ये