खासदार सुनील तटकरे : गुहागरमध्ये राष्ट्रवादीची आढावा बैठक उत्साहात
गुहागर, ता. 25: आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका कशा लढवायच्या याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. कार्यकर्त्यांनी पक्षाची बांधणी मजबूत करावी. प्रामाणिकपणे काम करणार्या कार्यकर्त्याला संघटनात्मक आणि शासकीय पदांवर काम करण्याची संधी निश्चित मिळेल. असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी गुहागरमधील आढावा बैठकीत केले.
गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा सभेमध्ये गुहागर नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष सौ. स्नेहा भागडे यांची नियुक्ती गुहागर राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष पदी तर श्रृंगारतळीतील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजित बेलवलकर यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँगेस गुहागर तालुका ओबीसी सेल अध्यक्षपदी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल रत्नागिरी जिल्हा कमिटी सदस्यपदी श्रीधर बागकर (बाग) यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्वांना खासदार तटकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना तटकरे म्हणाले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मला विजयी करून दिल्यावर लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मच्छीमारांचे प्रश्न, किनारपट्टीवरील सीआरझेड, पर्यटन विकास, रस्ते विकास या सर्वांमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा निधी तटकरे उपलब्ध करून देतील हा विश्वास सर्वांच्या मनात आहे. परंतु कोरोना, तौक्ते व निसर्ग वादळ, महापूर अशा मागोमाग आलेल्या संकटामुळे विकास कामांना मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन वर्षात लोकप्रतिनिधी म्हणून जनतेला भेटता आले नाही. तरीदेखील पक्ष पदाधिकार्यांशी सातत्याने संपर्क ठेवून गेल्या दोन वर्षात गुहागर तालुक्याला 1 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामांचा पाठपुरावा कार्यकर्त्यांनी करावा.
पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस बांधील आहे. मी राज्याच्या ऊर्जा खात्याचा मंत्री असताना केंद्र सरकारच्या मदतीने शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प पुन्हा सुरू केला. आज पुन्हा हा प्रकल्प अडचणीत आहे. तो बाहेर काढण्यासाठी तेथील अधिकार्यांसोबत बैठक घेणार आहे. सागरी महामार्गाचं स्वप्न पूर्ण झाले तर कोकणचा झपाट्याने विकास होईल. कोकणामध्ये हरित पट्टा असलेल्या महामार्गाची भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली आहे. जवळपास 6 हजार कोटींचा हा महामार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि सागर महामार्ग यांच्यामधून जाणार आहे. गुहागरमधील सीआरझेडच्या प्रश्नाबाबत आपण थेट एमसीझेडएमच्या सचिवांची भेट घेतली. हा विषय मार्गी लागणार आहे. याचपध्दतीने दापोली, खेड आणि अन्य तालुक्यातून सीआरझेडचा प्रश्नांची सोडवणूक करायची आहे.
प्रामाणिकपणे काम करणार्या कार्यकर्त्याला पक्ष संघटनात्मक पदे देईल. आज राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. विविध शासकीय कमिट्यांवरही कोणत्या पक्षाचे किती कार्यकर्ते घ्यायचे याचे वाटप झाले आहे. त्याप्रमाणात राष्ट्रवादीला उपलब्ध असलेल्या पदांच्या नियुक्ता कराव्यात यासाठी पालकमंत्र्यांजवळ चर्चा करणार आहे. आपल्या पक्षातील क्रियाशील कार्यकर्त्यांना ही पदेही दिली जातील. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी पुढील काळात पंचायत समिती गण निहाय बैठकांची रचना करावी. आगामी निवडणुका कशा लढवायच्या याचे धोरण वरिष्ठ पातळीवर ठरेल. त्यावेळी प्रमुख कार्यकर्त्यांचे मत विचारात घेतले जाईल. या निवडणुकांमध्ये उमेदवार कोण याचा विचार न करता सर्वांनी पक्षवाढीसाठी काम करावे. असे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी केले.
यावेळी आढावा बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, विधानसभा क्षेत्राध्यक्ष राजेंद्र आंबरे, गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, उपनगराध्यक्षा सौ. स्नेहा भागडे, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, माजी आमदार रमेश कदम, संजय कदम, गुहागरचे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर, सौ. चित्रा चव्हाण जिल्हाध्यक्षा महिला आघाडी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष मोहन मुळे, दिशा दाभोळकर जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी युवती काँग्रेस, साहील आरेकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, चिपळूणचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, अजय बिरवटकर, पांडुरंग पाते, युवती तालुका अध्यक्ष मृणाल विचारे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
संबंधित बातम्या वाचण्यासाठी खालील हेडिंगवर क्लिक करा.
हिवाळी अधिवेशनापर्यंत गुहागर सीआरझेड वर्ग २ मध्ये