गुहागर तालुका तेली समाज सेवा संघांतर्फे आयोजन
गुहागर, ता. 26 : रत्नागिरी जिल्ह्यातील तेली समाजातील क्रिकेट खेळाडुंना एक हक्काचे व्यासपीठ भेटावे व अनेक प्रतिभावंत खेळाडू नावारुपाला यावे तसेच क्रिकेट स्पर्धेतील नवीन प्रकाराची ओळख व्हावी या हेतूने गुहागर तालुक्यात प्रथमच जिल्हास्तरीय ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा अर्थात तेली प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा गुहागर तालुका तेली समाज सेवा संघ, गुहागर (रजि.) च्या वतीने दिनांक ११ व १२ मे २०२४ रोजी गुहागर शहर याठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. नुकताच या स्पर्धेतील खेळाडूंची संघ निवड (ऑक्शन) सोहळा ड्रॉ पद्धतीने सिद्धीविनायक रिसॉर्ट, वरवेली – गुहागर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. Teli Premier League Tournament

सदर खेळाडू संघ निवड (ऑक्शन) सोहळ्यात शिवशक्ति वरवेली, संताजी संग्राम गुहागर, मी तेली इलेव्हन स्टार चिपळूण- गुहागर, गावदेवी कालिकामाता धोपावे, शिवशंभो वेळंब, कै. संदेश इलेव्हन पाथर्डी, स्मरणिका वॉरीअर्स अडूर, अंतरा इलेव्हन कळमुंडी, चिपळूण इलेव्हन, एमजी वॉरीअर्स घोणसरे असे एकूण १० संघ सहभागी झाले होते. यात जवळपास एकूण १५४ खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली. या स्पर्धेकरिता जिल्हय़ातील खेड, चिपळूण, दापोली, रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर, लांजा, गुहागर अशा विविध तालुक्यातील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेच्या दोन दिवसीय कालावधीत महाराष्ट्रातून समाजाचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी या संपूर्ण स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा दाखविण्यात येणार आहे. तरी ही स्पर्धा यशस्वीतेसाठी समस्त तेली समाज बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. Teli Premier League Tournament