तहसिलदारांचे रास्तभाव धान्य दुकानदारांना आदेश
गुहागर, ता. 06 : गुहागर तालुक्यातील कोतवाल, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, बीएमसी पेन्शन धारक आदी शासकीय नोकरीत असणाऱ्या किंवा मानधन घेणाऱ्या व्यक्ती रेशनकार्डाव्दारे शासकीय अन्नधान्य योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांचा लाभ त्वरीत थांबवावा. असे आदेश तहसिलदार सौ.वराळे यांनी रास्तभाव धान्य दुकानदारांना दिले आहेत. तसेच अशा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिका धारकांना तहसिल कार्यालयात संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. Tehsildar’s order to grain shopkeepers

तहसिलदार यांनी दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे कि, केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 राज्यामध्ये दि. 5 जुलै 2013 पासुन लागु केला आहे. सदर अधिनियमानूसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी या दोन योजनेतून शासकीय अन्नधान्यवितरण केले जात आहे. तरी पंडीत दिनदयाळ उपाध्याय अभियान राबवण्याबाबतचा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण 2019/प्र.क्र.93नाहपु22 दि. 24/072019 नूसार योग्य व गरजू लाभार्थ्यांची निवड करण्याबाबत शासनाकडून कळविण्यात आले आहे. त्यानूसार शासकीय नोकर, शासकीय मानधन इत्यादी शिधापत्रिका धारक लाभ घेणेस अपात्र आहेत. त्यामुळे अशा शिधापत्रिकाधारकांचा शासकीय अन्नधान्याचा लाभ घेत असल्यास त्यांचा लाभ त्वरीत थांबविण्याचे आदेश तहसिल कार्यालयातून देण्यात आले आहेत. Tehsildar’s order to grain shopkeepers

तहसिलदारांच्या या पत्रामुळे शासकीय नोकरीत असणाऱ्या किंवा मानधन घेणाऱ्या शिधा घेणाऱ्या ज्या व्यक्ती अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी या दोन योजनेतून अन्न धान्य खरेदी करतात. त्यांचे धाबे दणाणले आहेत. शासन आपल्यावर नक्की कोणती कारवाई करणार, अशी भिती त्यांना वाटत आहे. Tehsildar’s order to grain shopkeepers
