अंजनवेल, रानवी व वेलदूर ग्रामपंचायतींची कारवाई
गुहागर, ता. 19 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाला (RGPPL Company) येथील अंजनवेल, रानवी व वेलदूर ग्रामपंचायतींनी एकूण ४ कोटी २५ लाख ४५ हजार ५८० रूपयांची जमीन व इमारत कराची नोटीस बजावली आहे. पहिली पंधरा दिवसांची मुदत संपुष्टात आली असून दुसरी नोटीस बजावण्यात येणार आहे. मात्र तीन नोटीसनंतरही कर न भरल्यास जप्तीची कार्यवाही सुरू केली जाणार असल्याची माहिती विस्तार अधिकारी स्वप्नील कांबळे यांनी दिली. Tax Notice to RGPPL Company


रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाने (RGPPL Company) २०२१-२२, २०२२-२३ या दोन वर्षाचा येथील अंजनवेल, रानवी व वेलदूर ग्रामपंचायतीचा इमारती व जमीन कर थकवला आहे. कर देण्यास कंपनीने नकार दिला होता. ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कर वसुली कायद्याप्रमाणे वसुलीच्या नोटीस बजावण्याची कार्यवाही केली होती. याविरोधात आरजीपीपीएल कंपनीने पंचायत समितीमध्ये अपील दाखल केले होते. हा दावा पाच महिने सुरू होता. जून महिन्यामध्ये या दाव्याचा निकाल येथील तीनही ग्रामपंचायतींच्या बाजूने लागला होता. Tax Notice to RGPPL Company


या दाव्याच्या निकालामध्ये ग्रामपंचायतीने तत्काळ कर वसुली न करावी, असा आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिला होता. त्याप्रमाणे अंजनवेल ग्रामपंचायतीने २०२१-२२ चा १ कोटी ५३ लाख ७८ हजार ३११ रूपये, व २०२२-२३ चा १ कोटी ४४ लाख ४४ हजार २५७ रूपये, रानवी ग्रामपंचायतीने २०२१-२२ चा ३८ लाख ५३ हजार ४३५ रूपये, २०२२-२३ चा ३४ लाख ८३ हजार ८५२ रूपये, वेलदूर ग्रामपंचायतीने २०२१-२२ चा ३७ लाख ६९ हजार ५५९ रूपये, २०२२-२३ चा ३६ लाख १६ हजार ४१६ रूपये जमीन व इमारती कराची मागणी पहिल्या नोटीसद्वारे केली आहे. पहिल्या नोटीसचा १५ दिवसांचा कालावधी संपुष्टात आला आहे. अशा तीन नोटीस बजावण्यात येणार आहेत. त्यानंतर जप्तीची कार्यवाही केली जाणार आहे, असे विस्तार अधिकारी स्वप्नील कांबळे यांनी सांगितले. Tax Notice to RGPPL Company