रत्नागिरी,ता.12 : जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील तन्मय प्रदीप हर्डीकर यांनी ‘व्याकरणरत्न’ ही पदवी संपादन केली आहे. अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत हर्डीकर यांनी सुयश मिळवले आहे. आंध्रप्रदेशमधील काकीनाडा येथे दि. ३ सप्टेंबरला त्यांची व्याकरणशास्त्राची महापरीक्षा झाली. त्यानंतर कांची कामकोटी पीठाधीश विजयेंद्र सरस्वती स्वामी महाराज यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. Tanmayala Vyakranaratna degree

या परीक्षेचे स्वरूप फार कठीण असते. संस्कृत भाषेतील विविध शास्त्रांचे पारंपरिक पद्धतीने अध्ययन प्रामुख्याने संस्कृत पाठशाळांमध्ये दिले जाते. या शिक्षणाच्या परीक्षा शृंगेरी, तेनाली इ. ठिकाणी घेतल्या जातात. श्री कांचीकामकोटी पीठातर्फे शास्त्रपोषक सभा, तेनाली (आंध्र प्रदेश) येथे शास्त्र परीक्षा आयोजित केल्या जातात. अद्वैत वेदांत, मीमांसा, व्याकरण आणि न्याय अशा ४ शास्त्रांच्या परीक्षा होतात. प्रत्येक शास्त्राची सहा महिन्यांनी परीक्षा होते. अशा साधारण १४ ते १६ सत्र परीक्षा होतात. यामध्ये १०० गुणांची लेखी आणि १०० गुणांची तोंडी परीक्षा होते. उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही परीक्षेत प्रत्येकी ५० गुण मिळणे आवश्यक असते. या सर्व सत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच कांची कामकोटी पीठाच्या शंकराचार्यांसमोर महापरीक्षा होते. महापरीक्षा फक्त तोंडी स्वरूपात असते. पूर्वी अभ्यास केलेल्या ग्रंथातील निवडक ग्रंथ अभ्यासक्रमात असतात. प्रत्येक ग्रंथावर एक वा दोन प्रश्न विचारले जातात. महापरीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्या त्या शास्त्रात ‘रत्न’ ही उपाधी देण्यात येते. तन्मय यांनी व्याकरण शास्त्रातील ही महापरीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर कांची कामकोटी पीठाधीश विजयेंद्र सरस्वती स्वामी महाराज यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. Tanmayala Vyakranaratna degree
आडिवरे गावात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तन्मय हर्डीकर यांनी रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात संस्कृत विषयातील पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर गोवा येथील महामहोपाध्याय आचार्य देवदत्त पाटील यांच्या गोवा येथील श्रीविद्या पाठशाळेत त्यांनी व्याकरणशास्त्राच्या अध्ययनाला सुरुवात केली. ब्रह्मश्री आचार्य मोहनलाल शिवनारायण शर्मा यांच्याकडे त्यांनी व्याकरणशास्त्राचे अध्ययन पूर्ण करून ही महापरीक्षा प्रथमश्रेणीत उत्तीर्ण केली आहे. व्याकरणाशास्त्राचे हे अध्ययन त्यांनी केवळ ४ वर्षात पूर्ण केले आहे. सध्या ते त्याच पाठशाळेत अध्यापन करीत आहेत आणि वेदान्तशास्त्राचे अध्ययनही करीत आहेत. या त्यांच्या अध्ययन प्रवासात पाठशाळेतील आचार्यांचे मार्गदर्शन आहेच. त्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांचेही महत्त्वाचे योगदान आहे. Tanmayala Vyakranaratna degree

रत्नागिरी येथील गो. कृ. रानडे पाठशाळेत १९५० पर्यंतच्या काळात व्याकरणशास्त्राचे अध्ययन करून व्याकरणरत्न, व्याकरणचूडामणी अशा उपाधी तत्कालीन विद्यार्थ्यांनी संपादित केल्या होत्या. या मोठ्या कालखंडानंतर रत्नागिरीवासी असलेल्या तन्मय हर्डीकर यांनी व्याकरणरत्न ही उपाधी मिळविली ही रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. एकविसाव्या शतकात शास्त्राध्ययनाची भारतीय परंपरा पुढे नेली जात आहे. ही अत्यंत आनंददायक आणि समाधानकारक बाब आहे. Tanmayala Vyakranaratna degree
