जिवाची होतिया काहिली ; १८ जुलै पासून रात्रौ. ०७.३० वाजता
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील त्रिशूळसाखरी गावातील सुपुत्र सुदेश (बापू) जनार्दन जाधव हा सोनी मराठी वाहिनीवरील ‘जिवाची होतिया काहीली’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सुदेश हा ‘बापू’ या टोपणनावाने सगळीकडे ओळखला जातो. घरातून कलेचा कोणत्याही प्रकारचा वारसा नसताना तो विद्यार्थी दशेत केवळ शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणुन नाटकांमध्ये त्याचा सहभाग असायचा. मात्र पुढे महाविद्यालयीन स्तरावर खऱ्या अर्थाने त्याची नाटकाशी ओळख झाली. Sudesh Jadhav in Marathi serial

१८ जुलै २०२२ पासून सोमवार ते शनिवार, रात्रौ. ०७.३० वा. ‘जिवाची होतिया काहिली’ या मालिकेत तो महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत तो पहिल्यांदाच फ्रेश एंट्री आणि एक आव्हानात्मक पात्र साकारणार आहे. भाषेपलीकडची प्रेमाची भाषा सांगणार्या या मालिकेत तो ‘कल्लूचे’ पात्र करणार आहे. सगळ्यांना मदत करणारा कल्लू. सगळी काम सरळ करताना ती नेहमी उलटी व उशिरा करणारा तितकाच सतत उत्साही पण सतत कामात गडबड करणारा असे त्याचे महत्वाचे पात्र या मालिकेच्या माध्यमातुन सर्वांना पहायला मिळणार आहे. Sudesh Jadhav in Marathi serial

आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये अभिनय, गायन, वादन, लेखन अशा विविध स्पर्धामध्ये तो सहभाग घेऊन उच्चतम सादरीकरण करू लागला. त्याच्या या उच्चतम सादरीकरणामुळे त्याला नेहमी त्यात बक्षीसही मिळू लागली. पुढे मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात शशिकांत महाजन दिग्दर्शित ‘टॅक्स फ्री’ या एकांकिका मध्ये त्याला अभिनयाचे उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. तेव्हापासून त्याचा आत्मविश्वास उंचावला. मग त्याने नाट्यशास्त्रातून एम. ए. पूर्ण करण्याचे संकल्प पूर्ण केला. मात्र नाट्यशास्त्र शिकूनही त्याला पुन्हा पथनाट्या पासून सुरुवात करावी लागली. मग पुढे प्रायोगिक नाटके, एक दोन एपिसोडच्या मालिकांमध्ये त्याला कामे मिळू लागली. यामध्ये अस्मिता, लक्ष, भेटी लागे जिवा, प्रेम पॉईजान पंगा आणि नुकतीच प्रसारित झालेली गाथा नवनाथांची अशा सारख्या विविध मालिकांमध्ये त्याला छोटेखानी भूमिका साकारायला मिळाल्या. याव्यतिरिक्त अनिल कपुर व अनुराग कश्यप यांच्या ‘एके वर्सेस एके’ या हिंदी सिनेमा मध्ये त्याने एक छोटी भूमिका केली. त्याचप्रमाणे नुकताच चित्रिकरण झालेला ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटात सुद्धा त्याला छोटी भूमिका करायला मिळाली आहे. अशा छोट्या मोठ्या कामातून त्याला आता एक नवी संधी मिळाली आहे. Sudesh Jadhav in Marathi serial
