रत्नागिरी, ता. 26 : माणसाला द्वेष, अहंकार लगेच जडतो. एखाद्याला जास्त गुण मिळू देत, त्याने मोठी खरेदी केली मग मला का नाही, असे माणूस बोलू लागतो. पण माणसाने निसर्गाकडून शिकले पाहिजे. माडावर नारळ वर्षभर धरतात, परंतु आंबे फक्त हंगामातच मिळतात, फणस झाडाच्या बुंध्यापासून लागतात. झाडे एकमेकांच्या जवळ असतात. पण ती एकमेकांना त्रास देत नाहीत. सुख- दुःख याचा विचार न करता अनुभवाने समृद्ध व्हायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन इन्फिगो आय केअरचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले. Special Award of Karhade Brahmin Sangh
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे विशेष पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी विशेष पुरस्कारांसह विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिके प्रदान करण्यात आली. कऱ्हाडे संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात कार्यक्रम झाला. या वेळी डॉ. ठाकुर यांनी प्रवास : एक अभ्युदयाचा मार्ग या विषयावर व्याख्यान दिले. Special Award of Karhade Brahmin Sangh
डॉ. ठाकूर म्हणाले की, एकदा स्वामीनारायण मंदिरात गेलो तिथे पायाला हात लावून नमस्कार करणारे अनेक साधू पाहिले. त्यांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की, माणसाचे वय लहान म्हणजे तेवढी पापं कमी. माझे वय जास्त असल्याने अहंकार झाला. तो ठेचण्यासाठी पायाला हात लावून नमस्कार करतो. अहंकार कमी करण्याचा नमस्कार हा एक उपाय आहे. आज ज्यांना विशेष पुरस्कार मिळाला त्यांचेही जीवन प्रवासातील अनेक अनुभव, संघर्ष, लढा असतील. दर महिन्याला असा अनुभव कथनाचा कार्यक्रम ठेवा. त्यातून आपण शिकूया. सावंतवाडी येथील म्हातारीच्या दातांचा हिशोब असा किस्साही डॉ. ठाकूर यांनी सांगितला. आयुष्यात चांगल्यापेक्षा आपण वाईट माणसांमुळेच जास्त मोठे होत असतो, हे विचार केल्यानंतर कळेल, असेही म्हणाले. Special Award of Karhade Brahmin Sangh
कार्यक्रमाला व्यासपीठावर रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये, ज्येष्ठ करसल्लागार चंद्रकांत हळबे कार्यकारिणी सदस्य प्रतिभा प्रभुदेसाई, अॅड. प्रिया लोवलेकर, दिलीप ढवळे, मानस देसाई आदी उपस्थित होते. अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी कार्यक्रमासंबंधी माहिती देऊन विशेष पुरस्कारप्राप्त ज्ञातीबांधवांचे कौतुक केले. सुरवातीला शांतीमंत्रासह दीपप्रज्वलन, सरस्वती आणि राणी लक्ष्मीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सूत्रसंचालन कार्यकारिणी सदस्य मानस देसाई यांनी केले. आभार सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी मानले. स्वरदा लोवलेकर हिच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. Special Award of Karhade Brahmin Sangh
विशेष पुरस्कार
नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अॅड. प्रिया लोवलेकर, नर्मदा परिक्रमा पदयात्री मंदार खेर, बालगंधर्व रंगसेवा पुरस्कार विजेते राजाराम शेंबेकर, सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या पहिल्या महिला अध्यक्ष सीए. सौ. अभिलाषा मुळ्ये यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्य संगीत नाट्यस्पर्धा यशस्वी कलाकारांचे मार्गदर्शक विलास हर्षे, संगीत दिग्दर्शन द्वितीय क्रमांक रामचंद्र तांबे, तबलावादनात द्वितीय क्रमांक प्राप्त अथर्व आठल्ये, गायन रौप्यपदक पटकावणारी सावनी शेवडे, अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त गुरुप्रसाद आचार्य, सौ. देवश्री शहाणे, ऑर्गनवादनात प्रथम क्रमांक प्राप्त हर्षल काटदरे, अखिल भारतीय सांस्कृतिक राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त स्वरदा लोवलेकर आणि अष्टपैलू कामगिरीबद्दल आदर्श विद्यार्थी पुरस्कारप्राप्त रुद्रांश लोवेलकर यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना विविध पारितोषिकांनी गौरवण्यात आले. Special Award of Karhade Brahmin Sangh