सिंधुरत्न समृद्धी योजना, मारुती होडेकर यांनी मानले आभार
गुहागर, ता. 26 : महाराष्ट्र शासनाच्या सिंधुरत्न समृद्धी योजनेत ९फेब्रुवारी २०२३ च्या सुधारित परिपत्रकानुसार आर्थिक दुर्बल घटकातील मच्छीमारांना बिगर यांत्रिक नौकांना देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही. हे भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी सभापती यांनी केलेल्या पत्रव्यवहारामुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक मच्छीमारांचा फायदा होणार आहे. असे सांगत साखरीआगर मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष मारुती होडेकर यांनी विठ्ठल भालेकर यांचे आभार मानले. Sindhuratna Samriddhi Yojana

समुद्रात मासेमारी करणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील मच्छीमारांच्या बिगर यांत्रिक नौकांना शासन परिपत्रक १ जुलै १९९९ पासून ५० टक्के अनुदान देण्यात येत होते. परंतु त्यासाठी वार्षिक उत्पन्न २०,०००/- चे आत असावे. ही अट होती. त्यामुळे सदर योजनेपासून अनेक मच्छीमार बांधव वंचित राहिले होते. मात्र महाराष्ट्र शासनाच्या सिंधुरत्न समृद्धी योजनेत, ९ फेब्रुवारी २०२३ च्या सुधारित परिपत्रकानुसार उत्त्पन्नाची अट ही शिथिल करण्यात आली. मात्र याबाबत मच्छीमार, मच्छीमार सोसायट्या यांना काहीच माहिती नव्हते. मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनाही सिंधुरत्न समृद्धी योजनेत झालेला बदल कळला नव्हता. त्यामुळे त्यांच्याकडूनही सदर उत्पन्नाच्या अटीतील शिथिलतेबाबत मच्छीमारांना माहिती मिळाली नाही. Sindhuratna Samriddhi Yojana
अखेर या सर्व विषयात गुहागर पंचायत समितीचे माजी सभापती व भाजपचे ज्येष्ठ नेते विठ्ठल तथा बावा भालेकर यांनी लक्ष घातले. महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्रव्यवहार केला. मंत्रालय कक्ष अधिकारी सुनिल निगडे यांच्याकडे याबाबत चर्चा केली. सुनिल निगडेंनी थेट मंत्री मुनगंटीवार यांची भेट घेवून उत्पन्नाच्या अटीबाबत तसेच योजनेची माहितीही विचारुन घेतली. मत्स्यव्यवसाय मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून शासनाचे परिपत्रक मिळवले. मंत्र्याजवळ झालेली चर्चा, सुधारीत आदेशांचे परिपत्रक आणि सिंधुरत्न समृद्धी योजनेतील मच्छीमारांसाठी उपयोगी असलेल्या योजना यांची माहिती निगडे यांनी बावाशेठ भालेकर यांना दिली. बावाशेठ यांनी तालुक्यातील संपर्कात असलेल्या मच्छीमार सोसायट्यांच्या अध्यक्षांना ही माहिती देवून अन्यत्र पाठविण्यास सांगितले. त्यामुळे तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल मच्छीमारांना मोठा फायदा थेट होणार आहे. Sindhuratna Samriddhi Yojana
विठ्ठल तथा बावाशेठ भालेकर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक मच्छीमारांना लाभ मिळणार आहे. सिंधुरत्न समृद्धी योजनेची माहिती देखील बावाशेठ यांच्यामुळे आमच्यापर्यंत विनाविलंब पोचली आहे. त्यामुळे त्यांचे जाहीर आभार मानतो. अशी प्रतिक्रिया साखरीआगर मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष मारुती होडेकर यांनी व्यक्त केली. Sindhuratna Samriddhi Yojana
काय आहे सिंधुरत्न समृद्धी योजना
सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक साधन सामग्रीवर आधारित पर्यटन, मत्स्य व्यवसाय व सूक्ष्म उद्योगांचा विकास करण्यासाठी ‘सिंधुरत्न समृद्ध’ ही पथदर्शी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यातील उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्ती व विकास क्षेत्रांची निवड करून त्या क्षेत्रांचा सूक्ष्म आराखडा तयार करण्यात येणार आहे. या योजनेकरिता पुढील तीन वर्षांत दरवर्षी १०० कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने दोन्ही जिल्ह्यातील कृषी, फलोत्पादन, पशुसंवर्धन विकास, मत्स्य व्यवसाय, पर्यटन, ग्रामविकास, लहान बंदरांचा विकास, नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित सूक्ष्म उद्योग, कौशल्य विकास अशा जिल्ह्यातील सर्व योजना, कार्यक्रमांची सांगड घालून जिल्ह्याच्या पर्यावरणक्षम शाश्वत विकासाचे मॉडेल तयार होणार आहे. दोन्ही जिल्ह्यातील तरुण उद्योजकांना स्थानिकस्तरावर नवीन उद्योगधंदे विकसित करण्यासाठी उपाय योजनांद्वारे प्रोत्साहित करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींसाठी व्यक्तिगत दरडोई उत्पन्न वाढीकरिता अतिरिक्त आर्थिक मदत उपलब्ध केली जाणार आहे.Sindhuratna Samriddhi Yojana

