मंडळाने दिली श्री लक्ष्मीनारायण मूर्तीची ऑर्डर मात्र प्रत्यक्षात मूर्ती आली श्री नर नारायणाची
लेखांकन – प्रमोद गुरुजी कचरेकर व कै.किसन साखरकर
गुहागर, ता. 04 : गुहागरला सांस्कृतिक वारसा बरोबरच प्रसिद्ध अशी देवस्थाने आहेत यातच वरचापाट येथील श्री नर नारायण मंदिर प्रतिष्ठापनेचा इतिहास रंजकच आहे. या अष्टकोनी मंदिराची सुंदर वास्तू सर्वांचे लक्ष वेधून घेते. या श्री नर-नारायण मंदिराची स्थापना १८२९ साली झाली असून या मंदिराला आज 118 वर्षे झाली. तर या मंदिराचा जिर्णोद्धार 2000 साली झाला असून या मंदिराचा आता रौप्य महोत्सव आहे. Silver Festival at Shri Nara Narayan Temple


या मंडळातील सर्वांनी मंदिर उभारण्यासाठी योगदान दिले आहे. सर्वांनी संघटीत होऊन दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव कै. महादेव गणू साखरकर यांचे घरी सुरू केला. आज ही प्रथा चालू आहे. परंतु आपले असे एक श्रीकृष्ण मंदिर असते तर असा विचार मनात आला व श्री लक्ष्मी नारायण मंदिर बांधण्याचे ठरले. मंदिरासाठी जागेचा प्रश्न दानशूर व्यक्तिमत्व असलेले कै. वामन महादेव साखरकर यांचे पिताश्री कै. महादेव गणू साखरकर यांनी चार गुंठे जागा मंदिरासाठी विनामूल्य दिली. चार पाखी चार पडव्या असलेले सुंदर अशी मंदिराची इमारत उभी राहीली. ओटीचा भाग सुमारे चार फुटांचे उंचीचे त्यामध्ये बंदिस्त असा गाभारा तयार करण्यात आला. आवारामध्ये एक विहीर खोदण्यात आली. मंदिराशेजारी उत्सवाचे कार्यक्रम करण्यासाठी रंगमंच बांधण्यात आला. रंगमंचावर रंगपटासाठी व वेशभूषेसाठी दोन खोल्या बांधण्यात आल्या. Silver Festival at Shri Nara Narayan Temple


कै. विठ्ठल हरी मोरे यांनी राजस्थानमध्ये श्री. लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीची ऑर्डर दिली. त्याचवेळी मुंबई माधवबाग येथील गुजराती समाज बांधवांनी त्याच मूर्तीकाराकडे श्री नर-नारायणाच्या मूर्तीची ऑर्डर दिली होती. त्यावेळी आजच्यासारखी दळण-वळणाची सोय नव्हती. सर्व वाहतूक सागरीमार्गे गलबतांतून चालायची. राजस्थानातून मुर्तिकाराने दोन्ही पार्सले एकाच गलबतातून गुहागर येथे आले. मूर्ती आल्याचे पाहून सर्वांना आनंद झाला. पार्सल फोडण्यात आल्यावर त्यामध्ये श्री लक्ष्मीनारायण ऐवजी श्री नर-नारायणाची मूर्ती पाहून सर्वांना अचंबा वाटला. परंतु नारायणाची मूर्ती आहे याचे समाधान मानून व ईश्वरी प्रसाद समजून कै. गणपत शिवराम कचरेकर व सौ. मुक्ताबाई गणपत कचरेकर या उभयतांच्या हस्ते मूर्तीची स्थापना करण्यात आली. तसेच मंदिरातील मोकळ्या आवारात कै. लक्ष्मण नारायण साखरकर यानी श्री हनुमंताचे मंदिर उभारून श्री हनुमंताची स्थापना १९३१ साली केली. Silver Festival at Shri Nara Narayan Temple


श्री नर-नारायणाच्या उजव्या बाजूस श्री गणेशाची मुर्ती आहे. मुर्ती विलोभनीय असून पुर्वाभिमूख आहेत. मंदिरामध्ये वार्षिक उत्सव, वर्धापनदिन, हनुमान जयंती, श्रीकृष्ण जन्माष्टमी व माघी गणेश जयंती हे उत्सव साजरे केले जातात. दरवर्षी चैत्र शु. त्रयोदशीला “वर्धापन दिन सोहळा” म्हणून साजरा केला जातो. त्यादिवशी सकाळी ५.३० काकड आरती स. ८ वा. श्री. षोडशोपचारे पूजा ग्रंथवाचन, रात्रौ १० वा. गावागावातील (परिसरातील) भजन मंडळींची भजने सादर होतात. त्यानंतर महाप्रसाद केला जातो. दुसरे दिवशी सायंकाळी ४.०० वा. मंदिराच्याभोवती श्रींच्या पालखीची रथयात्रा काढण्यात येते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी श्री हनुमान उत्सव साजरा होतो. हा उत्सव कै. किसन गोपाळ साखरकर कुटुंब स्वखर्चाने करतात. Silver Festival at Shri Nara Narayan Temple
श्री नर-नारायण देवतेचे महात्म्य प्रामुख्याने भागवत या पुराणातील चौथ्या अध्यायात वर्णन केलेले आहे. विष्णू देवतेच्या वरदानाने दक्ष प्रजापती ऋषिंची कन्या मुर्ती हिच्या उदरी नर-नारायण ऋषींचा जन्म झाल्याचे आख्यान आहे. हे दोन ऋषी द्विधा झालेल्या साक्षात परमात्म्याची रूपे असून त्यांचीच पुढील काळी श्रीकृष्ण व अर्जुन असे अवतार झाल्याचे आख्यान आहे. महाभारत या ग्रंथातील पांचरात्र या आख्यानात देवऋषी नारद यांनी याच आख्यानाचा अनुवाद केलेला आहे. नारायण, नारायण असा मंत्रघोष करीत नारदांचा विश्वसंचार प्रसिध्द आहे. विष्णू सहस्त्र नामातील केशवाय नमः माधवाय नमः नारायणाय नमः हा मंत्र यज्ञ याग ते गृहीणींच्या कलशपूजन व्रतात म्हटला जातो. Silver Festival at Shri Nara Narayan Temple