जैन तीर्थक्षेत्राची विटंबना आणि पर्यटनस्थळ घोषणेविरोधात
रत्नागिरी, ता. 21 : पालिताणा (सौराष्ट्र, गुजरात) येथे जैन समाजाचे प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान यांच्या पादुकांची समाजकंटकांनी विटंबना केली. या समाजकंटकांवर तत्काळ गुजरात सरकारने कारवाई करावी, या मागणीसाठी देशभरात सर्वत्र जैन समाज शांततामय पद्धतीने आंदोलन करणार आहे. रत्नागिरीमध्येही येत्या गुरुवारी दि. २२ रोजी सकल जैन समाजातर्फे मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत जैन समाजाची सर्व दुकाने, आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. Silent march of Ratnagiri Jain community
यासंदर्भात जैन समाजातर्फे माहिती देण्यात आली. पालिताणा येथे यात्रेकरिता देशभरातून लाखो जैन बंधू-भगिनी ये-जा करत असतात. परंतु या यात्रेदरम्यान समाजकंटक त्रास देतात. तसेच नुकतीच झालेली विटंबना निंदनीय आहे. या कृत्याचा निषेध नोंदवत जैन समाजाला यात्रेदरम्यान सुरक्षितता देण्यासाठी गुजरात राज्य सरकार आणि केंद्र सरकारला निवेदनही देण्यात येणार आहे. रत्नागिरीत गुरुवारी सकाळी ९.३० वाजता एसटी स्टॅंडजवळील जैन मंदिर येथून मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा जैन मंदिर, राम आळी, गोखले नाका, मारुती आळी, एसटी स्टॅंड, जयस्तंभ, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येईल. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. Silent march of Ratnagiri Jain community
शिखरजी तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ करू नये
झारखंड राज्यातील शिखरजी तीर्थ येथे २० तीर्थंकरांची कल्याणभूमी आहे. या ठिकाणी झारखंड राज्य सरकारने पर्यटनस्थळ विकसित करण्याची घोषणा केली आहे. याला सकल जैन समाजाचा तीव्र विरोध आहे. कारण पर्यटनस्थळ झाले की येथे मांसाहार, मद्यविक्रीसुद्धा सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कल्याणभूमीत जैन समाजाच्या भावना दुखावल्या जाणार आहेत. यामुळे जैन समाजाने याला देशभरातून विरोध दर्शवला आहे. या दोन्ही कारणांसाठी मूकमोर्चा व निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती रत्नागिरी सकल जैन समाजातर्फे देण्यात आली. Silent march of Ratnagiri Jain community