गुहागर, ता. 26 : “हाय रे हाय आणि … च्या जीवात काय नाय रे… होलियो!” हे शब्द कानावर पडले की कोकणी माणसाच्या अंगात काही वेगळंच बळ संचारतं. ढोल ताशांचे आवाज कानात घुमू लागतात. आपले देव साक्षात आपल्या दारी येतायत ही भावना मनामध्ये एका विलक्षण ऊर्जेची निर्मिती करते. संकासुर, खेळे, गोमू, दशावतार, नमन आणि मृदूंगावर पडणारी लयबद्ध थाप सगळं काही क्षणात डोळ्यासमोर थैमान घालू लागतं. खरंच शिमगा म्हटलं की, नव्या जल्लोषाची पाने कोकणी माणसाच्या आयुष्याला जोडली जातात. Shimga of Konkan at Virar
हाच शिमगोत्सव गुहागर तालुक्यातील विसापूर, पेवे पालकोट, पाटपन्हाळे, वरवेली, पांगारीतील सर्व ग्रामस्थ मिळून दरवर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी विरार येथे होळी निमित्त कोकणचे खेळे सर्वांना पाहायला मिळाले. हे ग्रामस्थ विरारमध्ये विविध भागात राहत असून होळीच्या दुसऱ्या दिवशी एकत्र येतात. पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्याच्या हेतुने कोकणचे खेळे हा जग प्रसिध्द असलेला खेळ आता कोकणातच नाही. तर गेली ५-६ वर्षापासून विरार मध्ये देखील पाहायला मिळतो. Shimga of Konkan at Virar
कोकणातील रहिवासी शहराकडे नोकरी व्यवसायास जरी स्थलांतरित झाले असले तरी ते आपल्या मायभूमीतील परंपरा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न शहराकडे देखील करत आहेत. शिमगा म्हणजे कोकणच असे एक समिकरणाचे खऱ्या अर्थाचे दर्शन विरारमध्ये पहायला मिळाले. ह्यामध्ये गोमू आणि संकासुर हे आकर्षण असते परंतु कोकणात ह्यांना देवाचे स्थान दिले जाते त्यामुळे ते एक देवाचे रूपच जणू. गाण्याच्या तालावर संकासुर नाचतात, आरती करतात आणि देवाला गाऱ्हाणे बोलतात. Shimga of Konkan at Virar