सुधाकर मासकर
‘ कोकण ’ म्हटलं की विविध परंपरा व सण अगदी धुमधडाक्यात साजरे केले जातात. त्यातलाच एक सण म्हणजे शिमगा. शिमगोत्सवात विविध संस्कृतीच्या लोककला साज-या केल्या जातात या लोककला हेच कोकणचे वैभव आहे. कोकणात शिमगा हा प्रत्येक गावात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक गावात विविध प्रकारच्या परंपरा असल्याने प्रत्येक गावी शिमग्याचे विविध प्रकार पहायला मिळतात. Shimga from Konkan
कोकण ही लोककलांची भुमी आहे. कोकणात विविध लोककला या जीवापाड जपल्या जातात. त्यात ‘ नमन किंवा खेळे ’ ही लोककला प्रामुख्याने आकर्षित करते. कोकणात नमन हे प्रामुख्याने सार्वजनिक उत्सव, विविध समारंभ इ. वेळी रात्रीचा करमणुकीचा कार्यक्रम म्हणुन आयोजित केले जातात. याला अपवाद आहे फक्त शिमगोत्सवाचा. शिमगोत्सव काळात नमन मंडळे गावभोवनीसाठी बाहेर पडतात ठिकठिकाणी ‘ काटखेळ ’ करतात. हि मंडळे गावागावात फिरुन गावातील इडा-पिडा टळो, शेतीला भरभराट येवो लोकांच्या जीवनात सुख समृद्धि नांदो यासाठी पारंपारीक कोकणी लोकगीते गातात. त्याचप्रमाणे बेटी बचाव, बेटी पढाओ , स्वच्छता राखा , सामाजिक सलोखा राखा यासारखे सामाजिक संदेशही यातुन देताना दिसतात. Shimga from Konkan
कोकणातील नव्या पिढीला आकर्षित करण्यासाठी जुनी काव्ये नवीन गाण्यांच्या चाली लावुन गायली जातात. गुहागरातील शिमगोत्सवात लहानमोठयांसह चाकरमान्यांचा व पाहुण्यांचा आकर्षणाचा केंद्रबिंदु असतो तो म्हणजे ‘ संकासुर ’. संकासुराबाबत विविध आख्यायिका सांगितल्या जातात. काहीजण संकासुराला देवीचा रक्षक म्हणतात तर काहीजण भगवान शंकराचा निस्सिम भक्त. काही ठिकाणी वेद चोरणारा तर काहीजण संकासुर हा देवाचे प्रतिकात्मक रुप असल्याचेही सांगीतले जाते. डोक्यावर उंच टोपरे, त्या टोप-यावर गोल फिरणारा गोंडा असतो. चेह-यावर कापडाचा मुखवटा त्याला लाल रंगाचे कापडी नाक, जीभ व कान तसेच निलगाईच्या शेपटीच्या केसापासुन बनवलेली पांढरीशुभ्र दाढीमुळे संकासुर अधिक आकर्षक दिसतात. कंबरेला कासे किंवा पितळेच्या धातुचे मोठया घुंघरुंचा पट्टा यातुन येणारा नाद हा संकासुर आल्याची चाहुल देतात. संकासुराच्या हातात रस्सी असते. संकासुर आपल्या घरी आले की त्यांची आरती करुन नमस्कार केला जातो. आपल्या हातातील रस्सीचा हळुवार फटका मारत संकासुर समोरच्या व्यक्तिला आशीर्वाद देतात असे मानले जाते. कोकणात शिमगोत्सव हा मार्च महिन्यात असल्याने उन्हाच्या झळा लागत असतानाही संकासुर हे मंडळांसोबत अनवाणी पायाने व काळा पायघोळ घालुन गावोगावी फिरुन आपली संस्कृती जपत असतात. Shimga from Konkan
संकासुर काटखेळे करत मृदुंग, टाळ व कोकणी लोकगीतांवर गोमुभोवती प्रदक्षिणा घालुन ठेका धरतो. त्यावेळी नाचण्याची लकब पाहुन तो पाहणारे मोहित होतात. कोकणी लोकगीतांना मृदुंग व टाळांसोबत संकासुराच्या कंबरेतील घुंघरुच्या संगीताची साथ असली की त्या ठेक्यावर पाहणा-यांचे पाय थिरकु लागतात. संकासुराची विजेच्या गतीने वळणारी मान व एखादयावर स्थिर होणारी भेदक नजर समोरच्या व्यक्तिला हादरवुन सोडते. काही ठिकाणी संकासुराला मुद्दामहुन करमणुक म्हणुन चिडवले जाते. मग नाचता नाचता चिडवणा-या व्यक्तिला एवढया गर्दीतुन बरोबर ओळखुन चित्त्याच्या चपळाईने बेसावध क्षणी संकासुर त्याला धावत जावुन पकडतो मग मात्र त्याची सुटका सहजासहजी होतं नसते.
गुहागर तालुक्यात काही ठिकाणी महाशिवरात्रीला सहाणेवर खेळ नाचतात. याला स्थानिक भाषेत ढोलकीवर पहिली थाप पडते अस म्हटलं जात. त्यानंतर फाल्गुन पंचमी म्हणजे फाकपंचमीपासुन हा लोककला महोत्सव गावागावात सुरु होतो. हा महोत्सव पहाण्यासाठी अनेक पर्यटक येतात. या निमित्ताने गावागावात आनंदाचे वातावरण निर्माण होते. म्हणूनच या शिमगोत्सवाची आस सर्वांना लागून राहिली आहे. Shimga from Konkan