हार्मोनियम सिंफनींनी रत्नागिरीकर तृप्त; वेगळ्या प्रयोगाला दाद
रत्नागिरी, ता. 28 : ‘जय जय रामकृष्ण हरी’ गजर आणि ‘सुंदर ते ध्यान’ या अभंगाचे सूर एकाचवेळी १००हून अधिक संवादिनीमधून उमटले आणि संपूर्ण प्रेक्षागृह भक्तीमय होऊन गेले. सुरांनी भारलेल्या वातावरणात एकामागोमाग एक अशा चार हार्मोनियम सिंफनींनी रत्नागिरीकर रसिकांचे कान तृप्त झाले. सुप्रसिद्ध ऑर्गनवादक पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सुरवातीचा ‘शतसंवादिनी’ कार्यक्रम म्हणजे शहराच्या सांस्कृतिक अवकाशात दीर्घकाळ निनादणारा ठरला. ‘Shatasamvadini’ program
संगीतकार आणि प्रसिद्ध संवादिनीवादक अनंत जोशी यांनी तयार केलेल्या हार्मोनियम सिंफनीसाठी रत्नागिरी आणि मुंबईतील १००हून अधिक संवादिनीवादकांनी केले. सिंफनी चार भागात वाजवली जाते म्हणून चारच प्रकार या वेळी सादर केले गेले. पहिल्या सिंफनीमध्ये गजर सादर झाला. दुसऱ्या सिंफनीमध्ये झपताल या तालावर रचना सादर करण्यात आली. झपताल हा मुख्यतः शास्त्रीय संगीतासाठी वापरला जातो; परंतु या सिंफनीसाठी अनोख्या पद्धतीने वापरला. तिसऱ्या सिंफनीत ‘याद पिया की आए’ या अत्यंत लोकप्रिय ठुमरीला पाश्चात्य संगीताची जोड देऊन मूळ रचनेला धक्का न लावता सादर झाली. चौथ्या सिंफनीत त्रितालवर आधारित मध्य व द्रुतलयीतील एक सुंदर रचना ‘तिहाई’ सादर केली गेली. यात सिंफनीमध्येही हिंदुस्थानी संगीत आणि पाश्चिमात्य संगीत यांचा सुंदर मिलाफ होता. याचा शेवट अनंत जोशी यांनी शास्त्रीय संगीतातील ‘झाला’ या प्रकाराने केला. त्याला सर्व संवादिनीवादकांनी उत्तम साथ दिली आणि सर्व रसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात सर्वांचे कौतुक केले. ‘Shatasamvadini’ program
या संपूर्ण सिंफनीमध्ये सर्व संवादिनीवादकांनी वेगवेगळ्या सुरावटी उत्तमरित्या सादर केल्या. गायकाच्या आवाजामागे एकाचवेळी गिटार, व्हायब्रोफोन, व्हायोलिन्स वाजत असतात. याचे प्रत्यंतर या कार्यक्रमाद्वारे आले. एकाचवेळी या सर्व वाद्यांचा स्वरमेळ उत्तम साधला गेला. हिंदुस्थानी आणि पाश्चात्य संगीताचा एक मिलाफ रसिकांनी अनुभवला. ‘Shatasamvadini’ program
अनंत जोशी, चैतन्य पटवर्धन, विजय रानडे, संतोष आठवले, महेश दामले, हर्षल काटदरे, मंगेश मोरे, चंद्रशेखर बांबर्डेकर, श्रीधर पाटणकर हे नऊ गुरू आणि त्यांचे शिष्य असे १००हून अधिक वादक होते. त्यात रत्नागिरीतील ७० हून अधिक तर ठाण्यातील वादकांचाही सहभाग होता. पं. अजित कडकडे यांना अनेक वर्षे साथ केलेले ज्येष्ठ हार्मोनियमवादक प्रकाश वगळ हे देखील यात सहभागी झाले होते. ‘Shatasamvadini’ program
ध्वनिव्यवस्थेची कमाल
हार्मोनियमवादक, साथसंगत करणारे कलाकार, निवेदक अशा सर्वांचे मिळून सुमारे ११८ माइक एकाचवेळी रंगमंचावर होते. एसकुमार साउंडचे उदयराज सावंत यांच्या उत्तम आणि कल्पक ध्वनिव्यवस्थेमुळे सर्वांचे सूर जुळून आले होते. ‘Shatasamvadini’ program
यांची उत्तम साथसंगत
आदित्य पानवलकर, प्रथमेश शहाणे (तबलासाथ), प्रणव दांडेकर (पखवाज), अद्वैत मोरे (तालवाद्य), शिवा पाटणकर (ऑक्टोपॅड) यांनी साथसंगत केली. निबंध कानिटकर, दीप्ती कानविंदे यांनी निवेदन केले. मान्यवर कलाकार तसेच गोविंदरावांचा सहवास लाभलेल्या व्यक्तींच्या त्यांच्या विषयीच्या आठवणी सांगणाऱ्या ध्वनिचित्रफिती या वेळी दाखवण्यात आल्या. ‘Shatasamvadini’ program