गुहागर, ता. 17 : चिपळूण तालुक्यातील तिवरे ग्रामस्थ, हरित मित्र परिवार आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने नुकताच तिवरे गावात बीजारोपण आणि रोपवाटिका निर्मितीसाठी पन्नास हजार बीजप्रदान उपक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला ‘मार्गदर्शक’ म्हणून सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश(बापू) काणे, जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट, पर्यावरण-पर्यटन चळवळीतील कार्यकर्ते आणि लेखक धीरज वाटेकर आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे कार्याध्यक्ष विलास महाडिक उपस्थित होते. Seed Planting Activities in Tivare Village


शासनाने अवैध वृक्षतोडीवर बंदी आणायला हवी आहे. उन्हाळ्यात झाडांना पाणी घालणे अवघड होत असल्याचे लक्षात घेऊन मोजकी झाडे लावून जबाबदारी घेऊन ती जगवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, अशा भावना तिवरे ग्रामस्थांनी श्रीव्याघ्राम्बरी मंदिरात झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केल्या. येत्या २४ जूनला तिवरेच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा रोपलागवड करण्याचा उपक्रम घेण्यात येणार असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी जाहीर केले. Seed Planting Activities in Tivare Village


जंगल राखण्यासाठी मालकांना अनुदान मिळायला हवे; प्रकाश(बापू) काणे
कोकणात खाजगी जंगले आहेत. इथे पैशासाठी जंगलतोड होते. या वृक्षतोडीला पायबंद घालण्यासाठी खाजगी जंगल मालकांना सरकारकडून जंगल राखण्यासाठी थेट अनुदान मिळायला हवे असल्याची भावना प्रकाश(बापू) काणे यांनी बोलून दाखवली. आगामी काळात त्या दृष्टीने पाऊले उचलायला हवीत, सरकारला विनंती करायला हवी, असेही ते म्हणाले. दिवसेंदिवस निसर्गाचे कालचक्र बिघडते आहे. महापूर येत आहेत. नद्या गाळाने भरल्यात. नद्यांच्या गाळ काढायला हवा आहे, असे ते म्हणाले. बांबू तोडायला सरकारची परवानगी लागत नाही. तीन वर्षात बांबूचे बेट तयार होते. यास्तव बांबू लागवडीचे आवाहन काणे यांनी केले. बीजारोपणांसाठी गावाला उपलब्ध झालेल्या बीयाणांपासून काही मोठी रोपे बनवून नंतर त्यांचे रोपण करायची सूचना काणे यांनी केली. Seed Planting Activities in Tivare Village


नेमकेपणाने मोजकी झाडे लावू आणि जगवू या; निलेश बापट
वृक्षलागवड करताना ती जगवली जातील या दृष्टीने ठोस नियोजन आवश्यक आहे. त्या दृष्टीने नेमकेपणाने मोजक्या संख्यची झाडे लावण्याचे आवाहन मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट यांनी केले. आकाशातून पाहिलं तर कोकणात शेतीचे चौकोन दिसतात. या चौकानांच्या बांधावर झाडांची लागवड व्हायला हवी असल्याचे ते म्हणाले. लागवडीसाठी १० वड, १० पिंपळ देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. दिव्याने दिवा लागतो, याप्रमाणे वृक्ष लागवडीचे काम करूया, असे बापट म्हणाले. Seed Planting Activities in Tivare Village


समुद्रकिनाऱ्यांसह सह्याद्रीतील निसर्गरम्य गावांची ओळख ‘दरडग्रस्त’ होणे दुर्दैवी; धीरज वाटेकर
वाढती वादळे आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने दहा हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार कोकणातील एक हजार पन्नास गावे ‘दरडग्रस्त’ ठरणार आहेत. पर्यटन समृद्ध कोकणातील समुद्रकिनाऱ्यांसह सह्याद्रीतील निसर्गरम्य गावांची ओळख ‘दरडग्रस्त’ होणे दुर्दैवी असल्याचे मत पर्यावरण-पर्यटन चळवळीतील कार्यकर्ते आणि लेखक धीरज वाटेकर यांनी व्यक्त केले. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावरील १०९ तर मंडणगड ते राजापूर या सह्याद्रीच्या पट्ट्यातील ५०३ गावे आहेत. आपल्या कोकणातील पूर्वजांनी पोटाला चिमटे काढून इथली खाजगी जंगल मालमत्ता जगवली, टिकवली. वृक्षतोडीमुळे इथल्या गावांची, जंगलांची आणि देवरायांची आजची स्थिती भयावह आहे. आपल्या देवरायांना किमान दोन हजार वर्षांचा वारसा आहे. आपण वृक्षकोश तपासला तर आपल्या देवरायातील अनेक झाडांची उपज ही आशिया खंडातील असल्याचे लक्षात येते. त्याकाळात ही झाडे इकडून इकडे कशी आली असतील? असा प्रश्न निर्माण होतो. नंतरच्या काळात अध्यात्मिक प्रभावामुळे ही वृक्षराजी बहरली. तिच्यात मंदिरे उभी राहिली. पेशवाई संपुष्टात येईपर्यंत आपल्या देवराया पूर्वजांकडून सांभाळलेल्या होत्या. ब्रिटिशांनी भारतीय देवरायांचे वर्णन ‘वृक्षांचा महासागर’ असे केले होते. विविध कारणांनी ब्रिटीशांच्या काळात देवरायांची, जंगलांची अधिकची तोड सुरु झाली, ती आजही सुरु आहे. तिचे परिणाम आपण अनुभवतो आहोत. म्हणून देशी जंगली वृक्षांचे बीजारोपण, वृक्षारोपण काळाची गरज आहे असे वाटेकर यांनी नमूद केले. Seed Planting Activities in Tivare Village


यावेळी हरित मित्र परिवाराच्या डॉ. महेंद्र घागरे यांनी सोलापूर विद्यापीठाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या बहावा, तिरफळ, कोकम, रिंगी, पुत्रंजीवा आदी जंगली वृक्षांचे ५० हजार बीयाणे यावेळी बीजारोपण आणि रोपवाटिका निर्मितीसाठी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे कार्याध्यक्ष विलास महाडिक यांनी तिवरे ग्रामस्थांना दिले. यावेळी बोलताना महाडिक यांनी, आपल्या रोपवाटिकेतील किमान तीन वर्षे वयाची झाडे लागवडीसाठी देण्याचे जाहीर केले. यावेळी माजी सरपंच नरसिंग शिंदे, कार्यक्रम आयोजक प्रतिक शिंदे, अमित शिंदे, साहिल शिंदे, पांडुरंग शिंदे, नागेश शिंदे, विपुल शिंदे, रविंद्र शिंदे, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या शैलजा लांडे, मायावती शिपटे, कल्पना देवरुखकर, नीलम मोहिते, किशोर मोहिते उपस्थित होते. Seed Planting Activities in Tivare Village