गुहागर, ता.27 : खालचापाट भंडारवाडा येथील श्री वराती देवीच्या नवरात्री उत्सव कार्यक्रम घेण्यावरून व मानपानावरून दोन गटात वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी येथील मंदिर परिसरात 144 कलम लागू केले आहे. यामुळे येथील देवीचा नवरात्री उत्सव साजरा करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. Section 144 applied in Bhandarwada

गेली वर्षभर येथील श्री वराती देवी युवा मंडळ व गोयथळे मोरे मंडळी यांच्यामध्ये श्री वराती देवीचे मंदिरातील मंदिर कमिटी रजिस्ट्रेशन करणे, उत्सव साजरे करणे व मानपान यावरून वाद सुरू आहेत. यावेळी नवरात्र उत्सव साजरा करण्यावरून दोन गटात मतभेद निर्माण झाले होते. यातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गोयथळे व मोरे मंडळी तर्फे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले होते. याबाबत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी दोन्ही कडील प्रमुख व्यक्तींना बोलावून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. याला यश न आल्याने अखेर तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी रविवारी रात्री उशिरा येथील भागात 144 कलम लागू केले. या आदेशात म्हटले आहे की, दि.२६ सप्टेंबर सकाळी ५ वा. ते दि. ५ आक्टोबर रोजी रात्री २२ वा. पर्यंत श्री. वराती देवी मंदीर व खालचापाट गुहागर परीसर येथे फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे बंदी आदेश लागू करणेत येत आहे. Section 144 applied in Bhandarwada

वराती देवी मंदिरामध्ये नवरात्री उत्सव कालावधीत पूजा व आरती करणेपासून दोन्ही पक्षकारांना व त्याच्या प्रतिनिधींना प्रतिबंधीत करण्यात येत आहे. पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी श्री वराती देवी मंदीर व मंदीर परिसर, खालचापाट गुहागर या ठिकाणी एकत्र जमाव करू नये. तसेच दगड, लाठ्या काठ्या, हत्यारे, घातक स्फोटक पदार्थ घेऊन फिरू नये, अशा सूचना करण्यात आले आहेत. या कालावधीमध्ये दोन्ही गटातील कोणीही खालील अटींचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सूचित करण्यात आले आहे. या वादामुळे मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. Section 144 applied in Bhandarwada
