गुहागरातील पहिलाच प्रयोग, मुर्तीकारांनी केले कौतुक
मयूरेश पाटणकर
गुहागर, ता. 18 : तालुक्यातील असगोलीतील विनय घुमे आणि विनायक घुमे या भावांनी एका गणेश मुर्तीला बाजीराव पेशवेंशी साधर्म्य दाखविणाऱ्या कपड्यांनी सजविले आहे. गुहागर तालुक्यात असा प्रयोग प्रथमच घुमे बंधुंनी केला आहे. वस्त्रांकित मुर्तीं सुंदर दिसत असून हे काम व्यावसायिक कलाकारांच्या तोडीचे झाले आहे. अशी प्रतिक्रिया व्यक्त करत मूर्तीकार नंदु तथा संदिप बारटक्के यांनी या कलाकारांचे कौतुक केले आहे. Sculptors clothed the Ganesha idol
एके काळी साध्या मुर्ती आणि साधे रंग काम मिळत असत. तंत्रज्ञानाने गणपती मुर्तींच्या रुपात भर पडली. वेलवेटच्या कापडासारखी वस्त्रे दिसतील असे रंग मिळू लागले. फ्युरोसंट रंगांनी काळाखोतही मुर्ती चमकु लागली. सोनेरी रंगाने रंगविलेल्या दागिन्यांची जागा आर्टीफीशयल खडे, मोती, सोनरी दागिने यांनी घेतली. त्यापाठोपाठ गणेश मुर्तीला खरेखुरे धोतर नेसवून, फेटा बांधुन सजविण्याचे काम सुरु झाले. यामुळे गणेश चित्रशाळेत मूर्तीकार, रंगकाम करणाऱ्या कलाकारांबरोबर सजावट करणाऱ्या कलाकारांनाही रोजगाराचे नवे साधन उपलब्ध झाले. Sculptors clothed the Ganesha idol
असगोलीतील विनय घुमे आणि त्याचा भाऊ विनायक घुमे यांनी गणेश मुर्तीला आकर्षक आणि उत्तम फेटा बांधण्याचे काम गेली 4-5 वर्ष करत आहेत. फेटा बांधण्यात ते इतके वाक्बगार झाले आहेत की, भाद्रपत गणपतीत तालुक्यातील विविध गणेश चित्रशाळेत ते फेटा बांधण्यासाठी त्यांना बोलावले जाते. यावर्षी गणेश मूर्ती कपड्यांनी सजविण्याचे काम कराल का अशी विचारणा एका गणेशभक्तांने त्यांच्याकडे केली. या गणेश भक्ताला डोक्यावर पगडी, अंगावर भरजरी वस्त्र आणि त्याला शोभेल असे उंची धोतराने गणेश मूर्ती वस्त्रांकित करायची होती. फेटा बांधण्याचे कौशल्य असलेल्या घुमे बंधुंनी हे नवे, आव्हानात्मक काम स्विकारले. इंटरनेटच्या माध्यमातून त्यांनी या कलेची माहिती घेतली. मुंबई जावून गणेश भक्ताच्या पसंतीची वस्त्रे, दागिने यांची खरेदी केली. गणेश मुर्ती वस्त्रांकित करायची असल्याने मूर्तीकाराने सदर मुर्तीचे तोंड, हात, पाय एवढेच भाग रंगविले. विनय आणि विनायक या दोघांनी दोन रात्र काम करुन बाजीराव पेशवेंशी साधर्म्य दाखविणाऱ्या कपड्यांनी ही मूर्ती सजवली. Sculptors clothed the Ganesha idol
गुहागर तालुक्यात असा प्रयोग प्रथमच होत आहे. काही गणेशभक्तांकडे वस्त्रांकित मूर्तींची स्थापना केली जाते. मात्र त्या मूर्ती रायगड जिल्ह्यातील पेण मधुन किंवा मुंबई, पुणे येथून आणलेल्या असतात. कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही उपलब्ध नसताना विनय आणि विनायक या दोन कलाकारांनी ही नवी पायवाट बनविली आहे. याचा प्रारंभही उत्तम प्रकारे झाल्याची ग्वाही मुर्तीकारांनी दिली आहे. आता गणेशोत्सवात या गणेशमूर्तीबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया काय येतात, याची उत्सुकता त्यांना आहे. Sculptors clothed the Ganesha idol