रत्नागिरी, ता. 24 : अनेक क्रांतीवीर घडवणारे, अन्यायाविरूद्ध लढणारे, विदेशी कपड्यांची होळी करणारे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या शौर्याची गाथा पोवाडा व पथनाट्यातून उलगडली. भारतमातेच्या या महान क्रांतीवीराचा अवमान करू नये, अशी विनंती या वेळी करण्यात आली. भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी हे पथनाट्य लक्ष्मीचौक आणि मंगळवार आठवडा बाजार येथे सादर केले. या पथनाट्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. Savarka’s bravery unfolded from street drama


वीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय, विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर संस्था आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सावरकर विचार जागरण सप्ताह सुरू आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी पथनाट्य, पोवाडा सादरीकरण झाले. यामध्ये शाहीर मयुरेश आगरे, ढोलकी वादक दर्शन शिंदे, वीर सावरकर अथर्व राडये आणि जनरल बॅरीच्या भूमिकेत मीत भोवड यांनी भूमिका बजावल्या. कोरसमध्ये आदित्य पायरे, रोहित जाधव, चिन्मयी पालकर, अमृता करमरकर, वैष्णवी बाणे, प्रियांका साखरपेकर, ऋतुजा भोवड, मिथिला वाडेकर, प्राजक्ता राडये आदी सहभागी झाले होते. Savarka’s bravery unfolded from street drama


लक्ष्मीचौक येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला उद्योजक गौरांग आगाशे, संयोजक रवींद्र भोवड, नानू सावंत, राजेंद्र फाळके, केशव भट, तनया शिवलकर व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. अविनाश रायकर यांनी श्रीफळ वाढवले. त्यानंतर पथनाट्याला प्रारंभ करण्यात आला. येथे अनेक सावरकरप्रेमी नागरिक उपस्थित होते. त्यानंतर मंगळवार आठवडा बाजार येथे भरपूर गर्दीच्या ठिकाणी पथनाट्य सादर केले. वीर सावरकरांचा विजय असो, जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. बाजारात खरेदीसाठी आलेल्या महिला, नागरिकांनीही या सर्व चमूचे अभिनंदन केले. Savarka’s bravery unfolded from street drama

