इंग्रज, फ्रेंच, मुघल, पोर्तुगीज, आणि इतर परकीय सत्ताना अरबी समुद्राचे पाणी पाजणारे, त्यांना जशास तसे उत्तर देणारे मराठा साम्राज्याचे प्रथम आरमार प्रमुख दर्याबहाद्दर सरखेल कान्होजी आंग्रे. स्व:पराक्रमाने इतिहासात मराठा साम्राज्याचा आणि स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटऊन अजरामर होणाऱ्या या योध्यास मानाचा मुजरा. मराठा साम्राज्याच्या आरमाराचे प्रमुख ’ सरखेल’ कान्होजी आंग्रे यांची ४ जुलै रोजी पुण्यतिथी, त्यानिमित्ताने त्यांच्या स्म्रुतीला उजाळा देणारा लेख.
समुद्राचा राजा – कान्होजी आंग्रे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कान्होजी आंग्रे सुवर्णदुर्ग येथे चाकरीला होते. सन १६८८ मध्ये सुवर्णदुर्ग चा किल्लेदार अचलोजी मोहिते पैसे घेऊन फ़ितूरीने किल्ला सिद्धीकडे सोपवणार, असे कळल्यावर कान्होजी यांनी सिद्धीवरून किल्ला लढवला. पुढे १६९८ मध्ये सरखेल सिधोजी गुजर गेल्यानंतर राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना सरखेल (आरमाराचा सरसेनापती) पद सोपवले. ते त्यांच्या म्रुत्युनंतर त्यांच्याकडेच होते. मराठा – मुघल युद्धामध्ये कोकणपट्टी सांभाळण्याचे कार्य कान्होजी आंग्रे यांनी यशस्वीरित्या पार पाडले. पोर्तुगीज, इंग्रज, आणि सिद्धी यांना त्यांनी चांगलेच जेरीस आणले. आणि संपुर्ण भागात आपला वचक प्रस्थापित केला. Sarkhel Kanhoji Angre
जन्म आणि वैवाहिक जीवन
कान्होजी आंग्रे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेडजवळील कालोसे या गावी १६६९ मध्ये झाला. वडिलांचे नाव तुकोजी संकपाळ आणि आईचे बिम्बाबाई होते. नवसाने आणि अंगाच्या धुपाराने कन्होजींचा जन्म झाला म्हणून आंग्रे हे आडनाव लावले गेले. त्यांनी ३ लग्ने केली. पहिली पत्नी राजूबाई/मथुराबाई. यांच्याकडून त्यांना सेखोजी आणि संभाजी म्हणजेच आबासाहेब अशी २ मुले झाली. सेखोजी हे नाव त्यांच्या आजोबांच्या नावावरून ठेवले गेले. दुसरी पत्नी राधाबाई/ लक्ष्मीबाई यांच्याकडून त्यांना मानाजी आणि तुळाजी असे २ पुत्र झाले, तर तिसरी पत्नी गहिणबाई यांच्याकडून त्यांना येसाजी आणि धोंडजी असे २ पुत्र झाले. शेवटी एक मुलगी झाल्याने तिचे नाव “लाडूबाई” ठेवले गेले. Sarkhel Kanhoji Angre
समुद्र किनारपट्टीचे रक्षण
कान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला जिंकुन घेऊन तेथे आपली राजधानी थाटली. छत्रपती महाराजांनी आंग्रे यांना आरमारचा प्रमुख केले. आंग्रे कोकण किनाऱ्याचे राजे झाले. इ.स. १७०० मध्ये राणी ताराबाईंनीही या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते मुंबईपर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठी ताब्यात दिली. या नव्या आव्हानाबरोबर कान्होजींना एकाच वेळी परकीय आणि स्वकियांबरोबर लढा द्यावा लागत होता. सन १७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फ़ुट पडल्यावर त्यांनी कोणाचीही बाजू न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरु केला. पुढे त्यांचे बालमित्र असलेला बाळाजी विश्वनाथ भट (पेशवे ) याने त्यांचे मन वळवून सातारा गादी बरोबर वळवंड, लोणावळा येथे तह करवला. कोकणाबरोबरच कच्छ, सौराष्ट्रपासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता कान्होजींच्या हाती होती. Sarkhel Kanhoji Angre
परकियांना पुरुन उरले
सागरी भागात मुक्तपणे संचार करणाऱ्या परकियांवर निर्बंध आले होते. १६९८ पासून मराठी राज्याची सारी सागरी सत्ता कान्होजींकडे आली होती. त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही सागरावर व्यापार करू शकत नव्हते. याचा प्रतिकार करण्याचे परकियांनी ठरवले. सर्व परकियांनी एकत्रित येऊन कान्होजींना संपविण्याचे असे ठरविण्यात आले. तरीही त्यांनी इंग्रज, पोर्तुगीजांनाही पराभुत केले. शत्रुच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी कान्होजींनी दुर दृष्टिने अगोदरच अनेकांशी मैत्रीचे संबंध ठेवले होते. अशा मदतीने त्यांनी आपले आरमार अधिक शस्त्रसज्ज केले. पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारीत पद्धतीने जहाज बांधनीचे कारखाने त्यांनी उभारले. या सुसज्जतेसह कान्होजींनी समुद्रकिनाऱ्यावर एक दबदबा निर्माण केला होता. कान्होजींचा लढा धार्मिक आक्रमनाची धार कमी करण्यासाठी पण होता. कान्होजी आंग्रे यांनी कोकणातील मंदिरासह , पंढरपुर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थानांना इनाम व रोख देणग्याही दिल्या. Sarkhel Kanhoji Angre
छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्रुत्युनंतरही औरंगजेबाला मराठी मुलूख काबीज करता आला नाही. यामागे अनेक शुर सरदारांचे योगदान होते. कोकण किनाऱ्यावरील राजसत्तेचा जागता पहारा असणारे कान्होजी हेही त्यातीलच एक. Sarkhel Kanhoji Angre