शृंगारतळीतील दलालांचे कृत्य, 43 लाख 60 रुपये रकमेची फसवणूक
गुहागर, ता. 29 : बनावट कुलमुख्यत्यार पत्र बनवून, 43 लाख 60 हजार रुपयांना परस्पर जागा विकून मुळ जागा मालकाची फसवणूक केल्याची घटना शृंगारतळीमध्ये घडली आहे. या घटनेची फिर्याद अब्दुल मुतल्लीब ताज अहमद साल्हे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. हा सर्व प्रकार गुंतागुंतीचा असल्याने अधिक तपास गुहागरचे प्रभारी पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते करत आहेत. Sale of land by making fake kulukhyatyar

अब्दुल साल्हे हे सॉफ्टवेअर इंजिनिअर (Software Engineer)असून सध्या ते नालासोपारा येथे रहातात. त्यांचे मुळ गाव श्रृंगारतळी. येथे त्यांची जमीन आहे. केवळ सणावाराला शृंगारतळीत येणाऱ्या अब्दुल साल्हे यांना आपली जमीन विकायची होती. त्यासाठी त्यांनी त्यांच्या ओळखीचे शृंगारतळीत जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करणारे रमजान ईब्राहीम साल्हे, मुश्ताक इसाक तांडेल, अमीर साल्हे या दलालांना सांगितले. शृंगारतळीत कायम येणे जाणे होत नसल्याने जमीन खरेदी विक्रीसाठी अब्दुल साल्हे यांनी या दलालांना कुलमुख्यत्यार पत्रही बनवून दिले होते. दरम्यानच्या काळात या कुलमुख्यत्यार पत्रावरील एक हिस्सेदार मयत झाला. याचा फायदा घेवून रमजान ईब्राहीम साल्हे, मुश्ताक इसाक तांडेल, अमीर साल्हे या तिन्ही दलालांनी एकमेकांच्या संगनमताने सर्व ठिकाणी एकमेकांना साक्षीदार राहून स्वतःचे नावे दुसरे कुलमुख्यत्यार पत्र तयार केले. अब्दुल साल्हे यांच्या शृंगारतळीतील भूमापन क्र. 64 या जागेची विक्री देखील केली. या विक्रीमधुन मिळालेले 43 लाख 60 हजार रुपये हे खरेदीदाराला तिघांच्या बँक खात्यात पाठवण्यास सांगितले. हा व्यवहार 29 जानेवारी 2022 ते 21 एप्रिल 2022 दरम्यान झाला. Sale of land by making fake kulukhyatyar

सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या अब्दुल साल्हे यांना जमीनीचा व्यवहार झाल्याचे कळले. त्यांनी रमजान ईब्राहीम साल्हे, मुश्ताक इसाक तांडेल, अमीर साल्हे यांच्याकडे खरेदी खताची मागणी केली. मात्र खरेदी खत देण्यास या तिन्ही दलालांनी टाळाटाळ सुरु केली. अधिक माहिती घेतल्यावर अब्दुल साल्हे यांना आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले. वेगवेगळ्या मार्गाने अब्दुल साल्हे यांनी या तिघांकडे वर्षभर जमीनीच्या व्यवहारांचे पैसे आणि खरेदी खत मागितले. मात्र तिघांनी अब्दुल साल्हे यांना दाद लागून दिली नाही. त्यामुळे अखेर अब्दुल साल्हे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. Sale of land by making fake kulukhyatyar
