धीरज वाटेकर
Guhagar News : सह्याद्रीतील निसर्गरम्य गावांची ओळख ‘दरडग्रस्त’ होणे दुर्दैवी असल्याचे आम्ही, जून महिन्यात कोकणातील सह्याद्रीच्या पूर्व खोऱ्यातील तिवरे गावी झालेल्या दोन वृक्षारोपण कार्यक्रमात म्हटले होते. दि. १९ रोजी कोकणातील रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर डोंगराचा काही भाग कोसळून गावच्या गाव दरडीखाली गुडूप झाल्याची, काहींना आपले प्राण गमवावे लागल्याची अत्यंत दुःखद घटना घडली आणि दरडींची भयानकता पुन्हा समोर आली आणि भविष्यात सह्याद्री पायथा निर्मनुष्य होण्याचा धोका अधिक गडद झाला. Sahyadri’s base is in danger of becoming desolate In future


सह्याद्री पर्वतात दरड कोसळणे आता नित्याचे झाले आहे. मागील काही वर्षात हे प्रमाण कमालीचे वाढले असल्याचे आपण पाहात आहोत. वाढती वादळे आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने दहा हजार कोटी रुपयांचा आराखडाही तयार केला. या आराखड्यानुसार कोकणातील एक हजार पन्नास गावे ‘दरडग्रस्त’ ठरली. सह्याद्रीतील, पर्यटन समृद्ध कोकणातील समुद्रकिनाऱ्यांसह सह्याद्रीतील निसर्गरम्य गावांची ओळख ‘दरडग्रस्त’ होणे दुर्दैवी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावरील १०९ तर मंडणगड ते राजापूर या सह्याद्रीच्या पट्ट्यातील ५०३ गावे आहेत. कोकणातील पूर्वजांनी पोटाला चिमटे काढून इथली खाजगी जंगल मालमत्ता जगवली, टिकवली. वृक्षतोडीमुळे इथल्या गावांची, जंगलांची आणि देवरायांची आजची स्थिती भयावह आहे. आपल्या देवरायांना किमान दोन हजार वर्षांचा वारसा आहे. आपण वृक्षकोश तपासला तर आपल्या देवरायातील अनेक झाडांची उपज ही आशिया खंडातील असल्याचे लक्षात येते. त्याकाळात ही झाडे तिकडून इकडे कशी आली असतील? असा प्रश्न निर्माण होतो. नंतरच्या काळात अध्यात्मिक प्रभावामुळे ही वृक्षराजी बहरली. तिच्यात मंदिरे उभी राहिली. पेशवाई संपुष्टात येईपर्यंत आपल्या देवराया पूर्वजांकडून सांभाळलेल्या होत्या.
ब्रिटिशांनी भारतीय देवरायांचे वर्णन ‘वृक्षांचा महासागर’ असे केले होते. विविध कारणांनी ब्रिटीशांच्या काळात देवरायांची, जंगलांची अधिकची तोड सुरु झाली, ती आजही सुरु आहे. तिचे परिणाम आपण अनुभवतो आहोत. इर्शाळवाडी घटनेच्या वार्तांकनात, आम्ही सातत्याने निसर्गाला दोष लावणारी विधाने ऐकली. प्रत्येक चांगल्या-वाईट घटनेची अचूक पूर्वकल्पना देणारा निसर्ग दोषी कसा? असा आम्हाला प्रश्न पडला. Sahyadri’s base is in danger of becoming desolate In future


आम्हाला जाणवलेलं दुसरं वास्तव सर्वात भयंकर आहे. अशा दरड दुर्घटनाग्रस्त ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे शहरातील नातेवाईक हे गावातील जमिनी सोडून सरकारकडून शहराला लागून असलेल्या ठिकाणच्या जमिनी मिळवून स्थलांतरित होण्याच्या तीव्र विचारात आहेत. त्यासाठी ते गावातील आपल्या बांधवाना अतिआग्रह करायलाही मागेपुढे पाहात नाहीत, हे वास्तव आहे. गावातला माणूस सहसा गाव सोडायला तयार होत नाही. अशांसाठी सध्याच्या विकास प्रक्रियेने जणू दोन पर्यायच तयार केलेत. पहिला अर्थात वृक्षतोडीचा, म्हणजे हळूहळू सगळे पायथे रिकामे करण्याचा! आणि दुसरा विकासाचा थेट ‘परशुराम घाट’ बनविण्याचा! दोन्ही विषयात आज ना उद्या सह्याद्रीतील पायथ्याला राहाणाऱ्या मूळ निवासी बांधवाना अनेच्छेने का होईना पण स्थलांतरित व्हावे लागेल असा आमचा सध्याचा विकास आहे. Sahyadri’s base is in danger of becoming desolate In future


सह्याद्रीतील जंगलांची बेसुमार तोड करणारे कोणीही पायथ्याला राहात नाहीत. जे राहातात, त्यांच्या वंशजांनी ही जंगले टिकवलीत. आजची बेसुमार वृक्षतोड मानवी मुळावर आलेली आहे. मात्र तिचे सध्याचे रूप आम्हाला सह्याद्रीपासून दूर नेण्याचा धोका आहे. ऐन वर्षा ऋतूत सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, धबधब्यांवर जबाबदारीने फिरायलाही बंदी होत असेल तर आम्ही नक्की कसला विकास साधतोय? मनुष्याने विकासाच्या अति हव्यासापोटी निसर्ग ओरबाडून काढल्याने, इर्शाळवाडी सारख्या घटना सातत्याने घडत राहून भविष्यात सह्याद्री पायथा निर्मनुष्य होणार आहे. Sahyadri’s base is in danger of becoming desolate In future