केतन अंभिरे, शिडाच्या नौकेने सीमा मंचची सागर परिक्रमा
मुंबई, ता. 27 : छत्रपती शिवाजी महाराजांचा सुरक्षेचा विचार किनारपट्टीवर पोचविण्यासाठी सागरी सीमा मंचने परिक्रमेचे आयोजन केले आहे. शिवरायांच्या आरमाराची अनुभूती घेण्यासाठी शिडाच्या नौकेने मुंबई ते विजयदूर्ग हा सागरी प्रवास होणार आहे. या दरम्यान चार ठिकाणी सागरी सुरक्षा व सागरी पर्यावरणाचे जागरण आम्ही करणार आहोत. असे माहिती सागरी सीमा मंचचे प्रांत संयोजक केतन अंभिरे यांनी दिली. Sagar Parikrama of Seema Manch by Shida boat
सागरी सीमा मंच व शिवशंभु विचार मंच या दोन संस्थेद्वारे शिडाच्या नौकेने गेट वे ऑफ इंडिया ते विजयदूर्ग अशी परिक्रमा करण्यात येणार आहे. या परिक्रमेसाठी भारतीय तटरक्षक दल, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, सीमा शुल्क भारत सरकार, सागरी पोलीस, मत्स व्यवसाय विभाग यांचे सहकार्य मिळाले आहे. बुधवारी 27 डिसेंबरला कुलाबा मच्छीमार नगर येथे सागरी परिक्रमेचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांताचे कार्यवाह श्री. विठ्ठलराव कांबळे आणि शिव शंभु विचार मंचे प्रांत संयोजक श्री. अभय जगताप यांच्या हस्ते होणार आहे. या परिक्रमेमध्ये 30 कार्यकर्ते सहभागी होणार आहे. सागरी परिक्रमेदरम्यान खांदेरी किल्ला, कुलाबा किल्ला, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग, रत्नदुर्ग आणि विजयदुर्ग या किल्ल्यांवर स्वच्छता मोहिम, किल्ला पुजन, किल्ला दर्शन आदी उपक्रम होणार आहेत. अलिबाग, बुरोंडी (ता. दापोली), रत्नागिरी या ठिकाणी जाहीर कार्यक्रमांचे आयोजन करण्यत आले आहे. 1 जानेवारीला सायंकाळी 7 वा. सागरी परिक्रमेचा समारोप विजयदुर्ग, (सिंधुदुर्ग जिल्हा) येथे होणार आहे. येथील कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज व रायगड स्मारक समितीचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे आणि सिंधुदुर्गचे पोलीस अधिक्षक ऋषिकेश रवाळे उपस्थित रहाणार आहेत. Sagar Parikrama of Seema Manch by Shida boat


याबाबत माहिती देताना सागरी सीमा मंचे प्रांत संयोजक केतन अंभिरे म्हणाले की, सागरी सीमांच्या सुरक्षांचे महत्त्व जाणणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे होते. त्यांनी स्थानिक मावळ्यांना घेऊन स्वराज्याची उभारणी केली. त्याचप्रमाणे किनारपट्टीवर आरमाराची उभारणी करतानाही त्यांनी किनारपट्टीवर रहाणाऱ्या मंडळींना सोबत घेतले. त्यांना स्वराज्य, आरमाराचे महत्त्व सांगितले. सागरी किनारपट्टी सुरक्षित रहाणे कसे आवश्यक आहे ते त्यांच्या मनावर बिंबवले. त्यातूनच सरखेल कान्होजी आंग्रे, मायनाक भंडारी, हिरोजी यांच्या सारखे लढवय्ये घडवले. आजची परिस्थिती बदलली असली तरी सागरी सीमांच्या सुरक्षेचे महत्त्व तितकेच आहे. मुंबईतील बॉम्बस्फोट असोत किंवा ताजवर झालेला हल्ला असो शत्रुने सागरी सीमांचाच वापर केला. त्यामुळे सागरी किनारपट्टीवर रहाणाऱ्या लोकांमध्ये सुरक्षेचा स्थायी भाव रुजणे आवश्यक आहे. समुद्रातील प्लास्टीक प्रदुषण गंभीर होत चालले आहे. याचे गंभीर परिणाम समुद्रसृष्टीतील जीवांबरोबर मनुष्यावर देखील होत आहेत. प्लास्टीकमुळे अनेक विषारी द्रव्ये मच्छीच्या माध्यमातून मनुष्यापर्यंत पोचत आहे. या प्रदुषणाला आपणच सर्वाधिक जबाबदार असल्याचे ते रोखण्याची संपूर्ण जबाबदारी आपलीच आहे. सागरी परिक्रमेदरम्यान या दोन विषयांची जनजागृती आम्ही करणार आहोत. Sagar Parikrama of Seema Manch by Shida boat
सागरी परिक्रमेदरम्यान अलिबाग (जि. रायगड), बुरोंडी व रत्नागिरी (जि. रत्नागिरी) आणि विजयदूर्ग याठिकाणी होणाऱ्या जाहीर कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित रहावे. तसेच मच्छीमार बांधवांनी समुद्रमार्गे प्रयाण करणाऱ्या परिक्रमावासीयांचे समुद्रात स्वागत करावे. असे आवाहन यावेळी अंभिरे यांनी केले. Sagar Parikrama of Seema Manch by Shida boat