शीर भाटले आंबेकर वाडीची व्यथा
गुहागर, ता. 23 : निवडणुका झाल्यावर नेते आश्र्वासने विसरतात. त्याचप्रमाणे वाडीचा पक्षप्रवेश झाल्यावर नारळ का फोडला हे पण नेते विसरले. मात्र त्याचा भुर्दंड आज तेथील कार्यकर्ता भोगत आहे. नेत्याच्या शब्दांवर विश्र्वास ठेवून, उधारीवर माल आणून बांधकाम झाले. पण गेल्या दोन वर्षात हा हिशोब पूर्ण करायचाच नेते विसरुन गेलेत. व्यापारी आणि कामगार मात्र उधारी आणि मेहनतान्यांच्या पैशांसाठी या कार्यकर्त्यामागे लागले आहेत. Sadness of Sheer Bhatle Ambekar Wadi
ही कथा आहे गुहागर तालुक्यातील शीर भाटले आंबेकरवाडीची. शृंगारतळी आबलोली रस्त्यावर भाटले आंबेकरवाडी आहे. या वाडीला प्रवासी निवारा शेड बांधुन हवी होती. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एका पक्षाच्या तालुका आणि जिल्हाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी आंबेकर वाडीला पक्षप्रवेशाची गळ घातली. प्रवासी निवारा शेडचा संपूर्ण खर्च देतो असे गाजर दाखवले. आंबेकरवाडीतील ग्रामस्थ आजपर्यंत ज्या पक्षाच्या पाठीशी कायम उभे होते त्यांनी असे काहीच दिले नव्हते. आपले काम होत असेल, आपल्या मुलाबाळांना, लेकी सुनांना गाडीची वाट पहात उन्हात थांबावे लागणार नसेल तर या पक्षात जायला काय हरकत आहे. असा सूर बहुतेक वाडकऱ्यांनी लावला आणि प्रवासी निवारा शेडच्या बदल्यात वाडीचा पक्षप्रवेश निश्चित झाला. आंबेकर वाडीतील बबन सोनु आंबेकर यांनी जमीन देण्याचे कबुल केले. Sadness of Sheer Bhatle Ambekar Wadi

सदर पक्षाच्या तालुका आणि जिल्ह्याचे मुख्य पदाधिकारी ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी आपल्या कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह भाटले आंबेकरवाडीत आले. प्रवासी निवारा शेडच्या भूमिपूजनाचा नारळ फोडण्यात आला. वाडीच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. मतांच्या गणितात भर पडल्याने नेते खुशीत होते. आपली मागणी पूर्ण होणार म्हणून ग्रामस्थ खुशीत होते. प्रवासी निवारा शेडच्या कामाला सुरवात झाली. साहेब आज चिरा आणि सिमेंट आले. थोडा चिरा कमी पडतोय. बांधकाम पूर्ण होत आलाय. रंग कोणता लावायचा. असे रोज फोन साहेबांना जात होते. साहेब फोनवरुनच मार्गदर्शन करत होते. अखेर मार्च 2020 मध्ये प्रवासी निवारा शेड बांधुन पूर्ण झाली. निवारा शेडवर नवतरुण विकास मंडळ आणि महिला विकास मंडळ शीर भाटले आंबेकरवाडीचा फलक झळकला. जमीन देणारे बबन सोनु आंबेकर यांचे नाव काळा पाटीवर सुवर्णाक्षरात लिहिले गेले. Sadness of Sheer Bhatle Ambekar Wadi
उद्घाटन सोहळ्याला दोन्ही नेत्यांना बोलावण्यात आले. मात्र दोघांपैकी कोणीच आले नाही. वाडीतील ग्रामस्थांनी उद्घाटनचा सोहळा पूर्ण केला. पुढे कोविडचं संकट आलं. दोन वर्ष निघुन गेली. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका देखील पुढे गेल्या . त्या कधी होणार याची शाश्वती नसल्याने नेते अन्य कामात गुंतले. मतांच्या गणिताऐवजी कामधंद्यांची गणिते मांडली जाऊ लागली. पक्षप्रवेश केलेल्या वाडीचाही विसर पडला. Sadness of Sheer Bhatle Ambekar Wadi

परंतु भाटले आंबेकरवाडीतील ग्रामस्थांना नेत्यांकडे घेवून जाणारा सामान्य कार्यकर्ता मात्र अडचणीत सापडला. प्रवासी निवारा शेडसाठी लागणारे साहित्य या वाडी कार्यकर्त्याने उधारीवर आणले होते. बांधकाम करण्यासाठी आलेल्या कामगारांची मजुरीही द्यायची होती. कामगार आणि व्यापारी रोज उधारी पूर्ण करण्यासाठी तगादा लावत होते. हा वाडी कार्यकर्ता दोन्ही नेत्यांना फोन लावून थकून गेला होता. सुरवातीच्या काळात पहिल्या रिंगला याचा फोन उचलणारे नेते आता १० फोन केले तरी उचलत नाहीसे झाले आहेत. वाडी कार्यकर्ता आणि ग्रामस्थ मात्र उधारीचे आकडे पूर्ण कसे करायचे या चिंतेत आहेत. Sadness of Sheer Bhatle Ambekar Wadi
