रत्नागिरी, ता. 01 : भारताच्या स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षात म्हणजे २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. तसेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया ७५ वे वर्षे साजरे करत आहे. या दोन्हीचे औचित्य साधून विकसित भारत या संकल्पनेवर भारतभर धावण्याची स्पर्धा आयोजित केली. याअंतर्गत रत्नागिरी सीए शाखेनेही भाट्ये येथे ही स्पर्धा उदंड उत्साहात केली. Running Competition by CA Institute
भाट्ये झरीविनायक मंदिरानजिक सकाळी साडेसहा वाजता या स्पर्धेचे उद्घाटन सीए शाखेच्या अध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये यांनी केले. सकाळच्या प्रसन्नवेळी आणि पावसाळी वातावरणात वाळूतून धावण्याच्या स्पर्धेत स्पर्धकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. स्पर्धेत जवळपास ५० हून अधिक सीए, विद्यार्थी, सीए फर्ममधील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत गौरव महाजनी यांनी प्रथम क्रमांक, राजेंद्र भावे यांनी द्वितीय आणि प्रतीक माळी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना आकर्षक चषक देऊन सीए अभिलाषा मुळ्ये, सीए शैलेश हळबे, सीए वरदराज पंडित यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष सीए शैलेश हळबे, सचिव सीए केदार करंबेळकर, सदस्य सीए प्रसाद आचरेकर, माजी शाखाध्यक्ष सीए भूषण मुळ्ये व सीए आनंद पंडित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. Running Competition by CA Institute