स्थानिकांना हटविण्यासाठी सुरक्षा रक्षक मंडळाचा वापर
गुहागर, ता. 19 : येथील रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीने गेल्या वर्षभरात प्रकल्पातील 28 स्थानिकांना घरी पाठवले. आता कंपनी व्यवस्थापनाची नजर खासगी ठेकेदाराकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या स्थानिक सुरक्षा रक्षकांवर आहे. त्यासाठी सुरक्षेचा ठेका घेतलेल्या सुरक्षा रक्षक मंडळाचा वापर केला जात आहे. RGPPL will now remove security guards
आरजीपीपीएलच्या निवासी संकुलाच्या सुरक्षेसाठी 10 महिन्यांपूर्वी सुरक्षा रक्षक मंडळाला ठेका देण्यात आला. हे सुरक्षा रक्षक मंडळ महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. रत्नागिरीचे कामगार आयुक्त हेच या मंडळाचे अध्यक्ष आहेत. हा ठेका देताना स्थानिक सुरक्षा रक्षकांना पगारवाढीसाठीसह अन्य सुविधा मिळतील असे आश्र्वासन आरजीपीपीएल व्यवस्थापन व सुरक्षा रक्षक मंडळाने दिले होते. प्रत्यक्षात पहिला पगार देतानाच या आश्र्वासनांवर आरजीपीपीएल व्यवस्थापनाने पाणी फिरवले. कामगार आयुक्त अध्यक्ष असलेल्या सुरक्षा मंडळाला हाताशी धरुन कोणत्याही भत्त्यांशिवाय, वाढ न करता पगार दिला. याबाबत सुरक्षा रक्षकांनी विचारणा केल्यानंतर सुरक्षा रक्षक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी हात वर केले.
आरजीपीपीएल व्यवस्थापन एवढ्यावरच थांबले नाही. एक स्थानिक सुरक्षा रक्षक या विषयाचा पाठपुरावा करत होता. आरजीपीपीएल व्यवस्थापनाने ठेकेदाराला न सांगता परस्पर त्याला कामावर येवू नये असे तोंडी आदेश दिले. बेकायदेशीररीत्या, परस्पर दिलेल्या आदेशाला न जुमानता हा सुरक्षा रक्षक कामावर येत होता. त्याला पायबंद घालण्यासाठी संबधित सुरक्षा रक्षक आरजीपीपीएलच्या परिसरात विना परवाना फिरतो. अशी तक्रार आरजीपीपीएल व्यवस्थापनाने गुहागर पोलीस ठाण्यात केली. पोलीसांनी देखील केवळ या तक्रारीच्या आधारे सुरक्षा अधिकाऱ्याला कामावर जाण्यास मज्जाव केला. आपल्याच कंपनीतील एका कर्मचाऱ्याबाबत घडलेल्या प्रकारावर कामगार आयुक्त आणि सुरक्षा रक्षक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीकडे कोणतीही विचारणा केली नाही. RGPPL will now remove security guards
आता आरजीपीपीएल व्यवस्थापनाने आपला मोर्चा सुरक्षा रक्षकांना कमी करण्याकडे वळवला आहे. तेवढ्यासाठी आरजीपीपीएल टाऊनशीपमधील एक सुरक्षा केंद्र अचानक रद्द करण्यात आले. सुरक्षा रक्षकांचा एक महिन्याचा पगार थांबवला गेला. तीन सुरक्षा रक्षकांना कमी केल्यानंतरच पगार मिळेल अशा तोंडी सूचना सुरक्षा रक्षक मंडळाकडे केल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड आपल्यापैकी कौणत्या सुरक्षा रक्षकांवर कोसळणार याची चिंता 32 सुरक्षा रक्षकांना सतावत आहे. RGPPL will now remove security guards
गेल्या दोन वर्षात आरजीपीपीएलचे धोरण स्थानिकांच्या विरोधात होत आहे. कोकणात येणाऱ्या कंपन्या सुरळीत सुरु झाल्यावर अशा प्रकारे स्थानिकांना विरोध करणारे रंग दाखवतात. त्यावेळी राज्य सरकार आणि राजकीय पक्ष स्थानिकांच्या बाजुने ठामपणे उभे रहात नाहीत. म्हणूनच येथे येणाऱ्या प्रकल्पांना विरोध होतो. – प्रसाद खानोलकर (आरजीपीपीएलमधील माजी सुरक्षा रक्षक) RGPPL will now remove security guards