संजय अग्रवाल, देशाला वीज देण्यासाठी सदैव तत्पर
(मयूरेश पाटणकर)
गुहागर, ता. 22 : देशातील सर्वात मोठ्या गॅसपासून वीज निर्मिती करणाऱ्या, पर्यावरणपूरक रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पाचा तोटा सलग दोन वर्ष 175 कोटींपेक्षा अधिक आहे. तरीही देशाला कोणत्याही क्षणी, मागणी असेल तेवढी वीज देण्याची क्षमता आम्ही राखून ठेवली आहे. असे प्रतिपादन आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अग्रवाल यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. RGPPL ready to provide electricity to the country
आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अग्रवाल म्हणाले की, यावर्षी एप्रिल ते जुलै दरम्यान आम्ही 439 मिलियन युनीट इतकी वीज निर्मिती केली. ही सर्व वीज राष्ट्रीय ग्रीडला देण्यात आली. 13 जून रोजी देशात वीजेचा मोठा तुटवडा निर्माण झाला. ही तूट भरुन काढण्याचे काम आरजीपीपीएलने केले. 1350 मेगावॅट वीजेचे उत्पादन करुन एका दिवसात आम्ही केले. एका अर्थाने देशाला आवश्यकता भासेल त्यावेळी मागणी असेल तेवढा वीजपुरवठा आम्ही करु शकतो हे आम्ही देशातील वीज क्षेत्राला दाखवून दिले आहे. मात्र तरीही आरजीपीपीएल आज मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात सुमारे 200 कोटी रुपयांचा तर 2022-23 या आर्थिक वर्षात सुमारे 175 कोटी रुपयांचा तोटा आरजीपीपीएलला झाला आहे. आज एनटीपीसीकडून मिळणाऱ्या कर्जावर या प्रकल्पाची देखभाल आम्ही करत आहोत. कधीतरी या प्रकल्पाला चांगले दिवस येतील या आशेवर आहोत. हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प नियमीत वीज उत्पादन करु शकला तर केवळ आरजीपीपीएलचा फायदा होणार नाही. RGPPL ready to provide electricity to the country
आमच्याबरोबर येथील स्थानिकांना रोजगार मिळेल. अनेकांना व्यवसायाची संधी मिळेल. पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प सुरु झाला तर रत्नागिरी जिल्ह्याचा विकास करण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये आहे. मात्र त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने या प्रकल्पाकडे सहानुभुतीने पहाण्याची गरज आहे. या प्रकल्पाचा जन्मच महाराष्ट्राला वीज देण्यासाठी झाला आहे. मात्र आज राज्य सरकार महागडी वीज म्हणून या प्रकल्पाकडे गांभीर्याने पहात नाही. दिवसेंदिवस तोटा वाढत राहीला तर वीज प्रकल्प बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय रहाणार नाही. त्यामुळे येथील माध्यमांनी, जनतेने, लोकप्रतिनिधींनी आमची व्यथा शासनापर्यंत पोचवावी. RGPPL ready to provide electricity to the country
या पत्रकार परिषदेला मानव संसाधन विभागाचे प्रमुख जॉन फिलीप, वाणिज्य प्रमुख पंकज झा, सहाय्यक महाप्रबंधक दामोदर सुरेश, विकास सिंग, अंतर्यामी दास, सी एण्ड एम विभागाचे प्रमुख दिपक पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. RGPPL ready to provide electricity to the country