महसूल विभागाचा 100 दिवसांचा कृति आराखडा कार्यक्रमांतर्गत
गुहागर, ता. 29 : तालुक्यातील गावागावांत महसूल विभागाचा 100 दिवसांचा कृति आराखडा या कार्यक्रमांतर्गत “जिवंत सातबारा ” ही मोहिम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत, सातबारा उताऱ्यावर मृत खातेदारांच्या वारसांची नोंदणी केली जाणार आहे. Revenue Department Work Plan
“जिवंत सातबारा मोहिम” अंतर्गत गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पुर्ण करावयाची आहे. मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. या दृष्टीकोनातून संपूर्ण राज्यात “जिवंत सातबारा मोहिम” राबविण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे. 1 ते 5 एप्रिल या कालावधीत प्रत्येक गावातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) चावडीवाचन करून मृत खातेदारांची यादी तयार करणार आहेत. खातेदारांच्या वारसांनी मृत खातेदारांचे मृत्यू प्रमाणपत्र, वारसांबाबत प्रतिज्ञापत्र / स्वयंघोषणापत्र (स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही), सरपंच / पोलीस पाटील / ग्रामविकास अधिकारी यांचा दाखला, वारसांचे नाव, वय, पत्ता, मोबाईल क्रमांक, रहिवासाबाबतचा पुरावा आदी कागदपत्रे 6 ते 20 एप्रिलपर्यंत ई – हक्क प्रणालीमार्फत (आपले सरकार सेवा केंद्र) ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेकडे जमा करावे लागणार आहेत. याच कालावधीत वारस ठराव मंजूर करण्यात येणार आहे. तदनंतर वारस ठरावाच्या अनुषंगाने दि. 21/04/2025 ते दि. 10/05/2025 या कालावधीत फेरफार प्रक्रिया पूर्ण करून वारसांची नावे 7/12 पत्रकात दाखल केली जाणार आहेत. Revenue Department Work Plan


सातबाऱ्यावरील मृतकांच्या नावामुळे अनेकांना खरेदी – विक्री व्यवहार, कर्ज प्रकरणात अडचणी येतात. या अडचणी दूर करण्यासाठी मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांना सर्वच 7/12 जिवंत करण्याच्या म्हणजेच सर्व मयत व्यक्तींची नावे कमी करुन वारसांची नावे दाखल करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. तरी या मोहिमेत नागरीकांनी दस्तऐवज वेळेत उपलब्ध करून www.pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्वतः किंवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फत अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना अर्ज करण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्यास संबंधित मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) किंवा तहसिलदार कार्यालयाशी त्वरीत संपर्क करावा. असे तहसिलदार गुहागर परिक्षीत पाटील यांनी सांगितले आहे. Revenue Department Work Plan