6 तरुणांचा वाचला प्राण, विसर्जन सोहळ्यातील अनिष्ट सरले
गुहागर, ता. 13 : एक मोठी लाट आली आणि विसर्जन करुन समुद्रातून परतत असलेले पाच तरुण पुन्हा समुद्रात ओढले गेले. पाण्याचा एक प्रवाह त्यांना आत खेचत होता. या प्रवाहातून बाहेर पडण्यासाठी तरुणांचा प्रयत्न सुरु होता. त्याचवेळी दोरखंडाला बांधलेला बोया दोघांच्या हाती लागला. आता आपल्या सहकार्यांना सोबत घेण्यासाठी या दोन तरुणांची धडपड सुरु होती. त्याचवेळी आणखी एक लाट आली उर्वरित सहकारी देखील बोयाच्या जवळ आले. पण तोपर्यंत बोयाला बांधलेला दोरखंड समुद्रात जाऊ लागला. दोरखंड ओढणारे चार पाच सहकारी जवळपास छातीभर पाण्यात लाटा झेलत उभे होते. जीवनमरणाच्या हिंदोळ्यावरचा हा काही क्षणांचा खेळ किनाऱ्यावर उभ्या असलेल्या सर्वांच्याच गळ्यात प्राण आणत होता. तितक्यातच आणखी 10-12 जणांनी धावत जावून खोल समुद्रात जाणारा दोरखंड पकडला. सर्वजण किनाऱ्यावर सुखरुप परतले आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. Rescue on Guhagar Beach
ही घटना गौरी गणपती विसर्जनाच्या वेळी गुहागरच्या समुद्रावर दुर्गादेवी पाखाडी परिसरात घडली. गुहागर नगरपंचायतीचे आशिष दिलीप सांगळे, जगन्नाथ धोंडु घोरपडे हे दोन सुरक्षा रक्षक होते म्हणून एक मोठी दुर्घटना टळली. Rescue on Guhagar Beach
गुहागर शहरातील साडेसात कि.मी. लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर 6 ठिकाणी गौरी गणपतीचे सामुहीक विसर्जन सोहळे संपन्न होतात. प्रत्येक ठिकाणी शहराच्या वेगवेगळ्या भागातून मिरवणुकीने गौरी गणपती विसर्जनासाठी आणले जातात. या सर्व ठिकाणी कोणतीही अघटीत घटना घडू नये म्हणून नगरपंचायतीद्वारे 2 ते 4 असे एकूण 18 सुरक्षा रक्षक तैनात केले जातात. या सुरक्षा रक्षकांकडे दोरखंड, बोया, लाइफ जॅकेट, शिट्टी असे साहित्य दिलेले असते.
12 सप्टेंबरला सायंकाळी अशाचप्रकारे दुर्गादेवी वाडीतील गौरी गणपतीची मिरवणूक दुर्गादेवी मंदिरासमोरील पाखाडीने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आली. भक्तीभावाने सर्व गौरी गणपतींची समुद्रावर सामुहिक आरती झाली. त्यानंतर एकेक गणपतीची मुर्ती घेवून तरुण समुद्रात विसजर्नासाठी जाऊ लागले. गणेश मूर्तींचे विसर्जन करुन समुद्रातून परतत असतानाच पाच ते सहा तरुण एका लाटेने खोल समुद्रात ओढले गेले. किनाऱ्यावरुन समुद्राचे निरीक्षण करणाऱ्या आशिष सांगळे, जगन्नाथ घोरपडे यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी तातडीने आपल्याकडील दोरखंडाला बोया बांधुन तो खोल समुद्रात भिरकावला. समुद्रात अडकलेल्या तरुणांसाठी ती आयुष्याची दोरी ठरली. दुर्घटना टळली. सर्वजण सुखरुप घरी परतले. मात्र जीवनमरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले हे तरुण आजही कालच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. Rescue on Guhagar Beach
समुद्रकिनाऱ्यावर नियुक्त केलेल्या सुरक्षा रक्षकांचे सावध निरीक्षण आणि धोका लक्षात आल्यावर क्षणाचाही विलंब न करता केलेली कृती निश्चितच कौतुकास्पद आहे. या दोन सुरक्षा रक्षकांचा आज गुहागर नगरपंचायतीने सत्कार करुन त्यांच्या कामगिरीबद्दल कौतुकही केले. या घटनेनंतर गुहागरमधील भाजप कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकांबरोबरच एक स्पीडबोट देखरेखीसाठी नियुक्त करण्याची विनंती गुहागर नगरपंचायतीला केली आहे. Rescue on Guhagar Beach