गुहागर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रशांत पाटील यांचा गौरव
गुहागर, ता. 01 : नागरिकांना शासकीय सेवा ऑनलाइन आणि वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आपले सरकार’ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीत रत्नागिरी जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. या कामगिरीत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल गुहागर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पाटील यांचा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. Ratnagiri tops in ‘Our Government’ service
‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्या अर्जांवर वेळेत कार्यवाही व्हावी आणि ऑनलाइन सेवांचा प्रभावी वापर वाढावा, यासाठी प्रशांत पाटील यांनी जबाबदारीने काम केले. त्यांच्या कार्याची दखल घेत वरिष्ठ स्तरावरून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अधिकारी व अंमलदारांनी केलेल्या प्रभावी कामकाजामुळे जिल्ह्याच्या कामगिरीला राज्यस्तरावर विशेष स्थान मिळाले. त्यामध्ये प्रशांत पाटील यांच्या योगदानाचाही समावेश आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी प्रशांत पाटील यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. नागरिकाभिमुख सेवा देताना अशीच कार्यक्षमता, तत्परता आणि जबाबदारी कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. Ratnagiri tops in ‘Our Government’ service
राज्यस्तरीय कामगिरीत मिळालेला हा सन्मान गुहागर पोलीस ठाण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ठरला आहे. प्रशांत पाटील यांच्या गौरवाबद्दल सहकारी अधिकारी, अंमलदार आणि नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. Ratnagiri tops in ‘Our Government’ service
