रत्नागिरी सायकलिस्ट क्लब; सलग दुसऱ्या वर्षी उपक्रम
रत्नागिरी, ता. 21 : श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त गुरुवारी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे नाचणे पॉवरहाऊस येथील श्री गजानन महाराज मंदिर ते गोळप येथील श्री गजानन महाराज मंदिरापर्यंत व पुन्हा रत्नागिरीत परत अशा सायकल रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला. जय गजानन, श्री गजानन असा जयघोष करत या सायकल रॅलीमध्ये क्लबचे सदस्य आणि रत्नागिरीकर सहभागी झाले. Ratnagiri Cyclist Club


सकाळी ६ वाजता नाचणे येथील श्री गजानन महाराज मंदिरात सायकलिस्ट एकत्र आले. याप्रसंगी महाराजांचे दर्शन घेऊन रॅलीला सुरवात करण्यात आली. तत्पूर्वी श्री गजानन महाराज मंदिराचे संस्थापक अध्यक्ष म. वा. देसाई यांनी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक करून छोटेखानी सत्कार केला. त्यानंतर रॅलीला सुरवात झाली. ही रॅली जयस्तंभ येथून भाट्ये, कसोप, फणसोप, वायंगणी, जोशी कंपाऊंड, कोळंबे फाटा, फिनोलेक्स फाटा मार्गे गोळप येथे पोहोचली. रॅलीमध्ये एसआर विनायक पावसकर यांनी त्यांच्या वडिलांची १९७८ सालची प्रसिद्ध घोडा सायकल आणली होती. त्यावरून त्यांनी त्यांचा मुलगा वेदांत याला डबल सिट आणले होते. एसआर, शालेय विद्यार्थी, नोकरदार, डॉक्टर, व्यावसायिक मंडळी या रॅलीमध्ये सहभागी झाले. त्यामुळे ही रॅली वैशिष्ट्यपूर्ण ठरली. गोळप येथे ही रॅली पोहोचल्यानंतर श्री गजानन महाराज देवस्थानचे माधव गोगटे यांनी सर्व सायकलिस्टचे स्वागत केले. मंदिरात श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण सुरू होते. या वर्षी मंदिरात दर्शनासाठी रांगेची व्यवस्था करण्यात आली. श्री महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरातर्फे सायकलिस्टची अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. Ratnagiri Cyclist Club


उपक्रमशील क्लब
कोकणातील सर्वात मोठा आणि देशभरातील सायकल उपक्रमांमध्ये भाग घेणारा अशी ओळख असलेल्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे गेली चार वर्षे विविध विषयांसाठी सायकल रॅली व विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. कोकणात भागात सायकल चळवळ वाढावी म्हणून क्लब भरपूर प्रयत्न करत आहे. क्लबतर्फे रोलर कोस्टर सायक्लोथॉन ही सायकल स्पर्धाही घेतली जाते. या क्लबने यापूर्वी विधी दिन, स्वस्थ इंडिया सायकल राईड, मतदार जनजागृती सायकल फेरी, हर घर तिरंगा सायकल फेरी, सायकल डे रॅली, गुढीपाडवा शोभायात्रेत चित्ररथ, अयोध्येत श्रीराम मंदिर स्थापनेनिमित्त सायकल रॅली अशा अनेक उपक्रमांचे आयोजन केले. तसेच भारतभरातून २०० सायकलप्रेमींना एकत्र आणून रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनाचे देखील यशस्वी आयोजन केले आहे. Ratnagiri Cyclist Club