सुमारे ७० दुकानदार, खोलीभाड्यासह कर्मचाऱ्यांची देणी थकली
गुहागर, ता. 01 : गुहागर तालुक्यातील सुमारे ७० रेशनदुकानदारांचे कमिशन गेले ६ महिने रखडले असून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. खोलीभाड्यासह धान्य वितरणासाठी मदतीला असणाऱ्या कर्मचाऱ्याचीही देणी यामुळे थकली असून आणखी किती महिने कमिशनविना काढायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. Ration Shoppers in Guhagar No Commission
पंतप्रधान गरीब कल्याण योजना शासनाने बंद करून एकमेव सुरू असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून जानेवारी 2023 पासून प्रति लाभार्थीला मोफत धान्य वितरण सुरु करण्यात आले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार, प्राधान्य गटासाठी वार्षिक उत्पन्न 44 हजार रुपये असल्यास या गटात समावेश होतो. या गटासाठी 2 किलो गहू व तीन किलो तांदूळ प्रतीलाभार्थी दिला जात होता. त्यासाठी गहू 2 रुपये किलो तर तांदूळ 3 रुपये किलो दराने मिळत होता. आता हेच धान्य मोफत मिळत आहे. तर अंत्योदय या गटासाठी 15 किलो गहू व 20 किलो तांदूळ प्रतिकार्ड दिला जातो. धान्य मोफत मिळत आहे. यात शिधापत्रिका धारक खूप आनंदात आहे मात्र हे मोफत धान्य वितरित करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांना मागील ६ महिन्यांपासून कमिशन न दिल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. Ration Shoppers in Guhagar No Commission


स्वस्त धान्य दुकानदारांना प्रति क्विटल धान्यामागे जे काही कमिशन मिळते ते अगदीच तुटपुंजे असते. त्या कमिशन मधूनच धान्य वितरणासाठी लागणारी स्टेशनरी व रोजगार सांभाळावा लागतो. शिवाय अनेक दुकाने भाड्याच्या खोलीत आहेत त्यामुळे त्यांना दर महिन्याला भाडे सुद्धा द्यावे लागते. या सर्व बाबी सांभाळत असताना वेळेवर कमिशन मिळत नसल्याने स्वस्त धान्य चालक कमालीचे आर्थिक संकटात आले आहेत. कमिशन मिळावे यासाठी दुकानदार वरिष्ठ अधिकाऱ्यांना साधी विचारपूसही करु शकत नाहीत, परंतु काही दुकानदार दबक्या आवाजात कमिशन मिळावे असा सूर काढत आहेत. अन्न पुरवठा विभागाकडून दुकानदारांचे कमिशन काढण्यासाठी दिरंगाई का होते, हे न समजणारे कोडेच आहे. Ration Shoppers in Guhagar No Commission