सत्योतर सत्य ही नवी संकल्पना असलेली वैश्विक कादंबरी – भारत सासणे
गुहागर, ता. 03 : दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्यावतीने, अथर्व पब्लिकेशन ,जळगाव, प्रकाशित “चिंबोरेयुद्ध”या प्रसिद्ध साहित्यिक बाळासाहेब लबडे लिखित कादंबरीचा प्रकाशनाचा कार्यक्रम रविवार दि.०२/०६/२०२४ जून रोजी संध्याकाळी ५.वा; पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे.येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मा.भारत सासणे यांनी मराठी कादंबरीतील प्रायोगिक कादंबरीचा आढावा घेऊन त्यात चिंबोरेयुद्ध या कादंबरीचे वेगळेपण स्पष्ट केले. Publication of the novel “Chimboreyuddha”
“चिंबोरेयुद्ध ही क्लासिक प्रकारातील वेगळ्या चेहऱ्याची कादंबरी असून ही Simply स्तरावरावरील रूपकात्मक कादंबरीच्या तोडीची कादंबरी आहे. तिचा आशय शैली आकृतीबंध हा वैश्विक स्वरूपाचा आहे. मराठी साहित्यात कलावाद व वास्तववाद याच्या आज पर्यंतच्या झगड्याच्या निकषाच्या पलिकडे गेलेली कादंबरी आहे त्यामुळे तिच्यातील अँब्सर्डीटीचा पैलू महत्वाचे आहेत. सत्योतर सत्य(post truth) ही नवी संकल्पना यात आहे. कल्याणवाद मूल्यवादी जाणीव यात आहे. उद्याचा भविष्यवाद निराशावाद झुगारून मांडला आहे. मराठी साहित्यात या कादंबरीची चर्चा व्हायला पाहिजे कारण ही लोकप्रिय कादंबरी नाही. मानवी जीवनातील सनातन झगड्याचे चित्रण ही कादंबरी करते आहे.
तर कादंबरीचे प्रकाशन प्रा.डाँ दिपक बोरगावे म्हणाले कि, “चिंबोरीमॅनचे हे ‘चिंबोर जग’ आहे. हे चिंबोरी युद्ध आहे. स्वप्न, वास्तव, अद्भुतता, फॅन्टसीची जाणीवपूर्वक आदिबंधात्मक रूपकांची योजना करून बाळासाहेब लबडे यांनी या नव्या कादंबरीचे बांधकाम केले आहे. त्यांच्या मागील तीन कादंबऱ्यांचा विचार करता, हे एक नवे विश्व साकारण्यात त्यांना कमालीचे यश प्राप्त केले आहे. ॲनिमेशनच्या जगात जावे तसे समुद्र खाडीच्या विश्वाला जगावेगळा लाईफ साईजचा आकार देऊन ते आपणाला सद्य:स्थितीची गोष्ट सांगत आहेत (वास्तविक पाहता, ही गोष्ट नसलेली एक गोष्ट आहे). हा एक फार महत्त्वाचा मुद्दा या कादंबरीच्या निमित्ताने सांगायला हवा. पण वरकरणी हे असे दिसत नाही. यातच बाळासाहेब लबडे यांच्या कलात्मकतेचा अविष्कार दडलेला आहे. हेच महत्त्वाचे वैशिष्ट्य त्यांना विसाव्या शतकातील पूर्वसुरीच्या मराठी कादंबरीकारांपासून वेगळे करणारे वैशिष्ट्य आहे असेच म्हणावे लागेल.” Publication of the novel “Chimboreyuddha”
प्रमुख वक्ते श्री. दागो काळे म्हणाले, “या कादंबरीत खेकड्याच्या वापरलेल्या रूपकामधून लेखक अनेकार्थाने मानवी वृत्ती-प्रवृत्तीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तसेच मानवी भावविभाव व स्वभावाचे दर्शन घडवितो.त्यांच्यात असलेले जातीनिहाय समूहभान,आपल्या विचाराआचारांची वेगवेगळी बिळे,अन्यायाला चिवटपणे भिडण्याची वृत्ती त्यांच्यात उपजतच आली आहे. त्यातून माणसांची प्रत्यक्षातील अभिरूपता त्यांनी निर्माण केली आहे. हा लेखक त्यांच्या अभिरूपतेतून माणसाच्या असण्याचे प्रतीरूप घडवत पुढे जातो. मानवी स्वभावाच्या तसेच त्यांनी घडविलेल्या सगळ्या अधिरचनांचा विचार या प्रकरणांमधून आला आहे.आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घटितांचा विचार आणि त्याच्या डावेउजवेपणावर अलगद बोट ठेवत जातो. खेकड्यांच्या नावांमधून साधलेल्या स्वभावविशेषांमधून त्याच्या मूलभूत प्रवृत्तीकडे निर्देश होत जातो. त्यांच्या अस्तित्वाच्या बाजू कळत जातात. त्या कळण्यातून आपण केव्हाच आपल्या पर्यंत येण्याचा प्रयत्न करतो. आपोआपच आपल्या वृत्ती-प्रवृती दर्शवणारे जनावर आपणच आहोत याची मनोमन खात्री होते.आपल्यात एका मोठ्या किटकाचे झिरपणे सुरू असल्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. जसे आपल्यात असणाऱ्या प्रवृत्तींचे अवशेष आपल्याच सभोवतालात अनेक जीवजंतू, प्राण्यांकिटकांमध्ये असतात. त्यांच्या आदानप्रदानातून स्वभावधर्मातून आपण घडत असतो.त्यांच्या आपल्या प्रवृत्तीच्या सळमिसळेतून आपण फिक्शन निर्माण करीत साहित्य व्यवहार जगत असतो.” Publication of the novel “Chimboreyuddha”
प्रमुख पाहुणे म्हणून श्री रामदास नेहूलकर सहसंपादक दै केसरी हे होते.त्यांनी चिंबोरेयुद्ध मधील कवच्याकंकाळ, आबा, बाबा, खलणवीस, चिलापी, ही सगळी पात्रे आजच्या राजकारणातील समकालीन पात्रे आहेत. यात आजच्या राजकीय नाट्याचे प्रतिबिंब उमटले आहे. ते प्रभावी, लालित्यपुर्ण, चिकित्सक,अन्वयार्थकपणे आले आहे. त्यामुळे ही कादंबरी मराठीतील महत्वपुर्ण राजकीय कादंबरी आहे.मा. शिरीष चिटणीस (पुणे शहर प्रतिनिधी, म.सा.प.पुणे, अध्यक्ष, दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सातारा.)यांनी प्रास्ताविकात बाळासाहेब लबडे यांच्या एकूण साहित्याचा आढावा घेतला. आणि श्री. युवराज माळी( प्रकाशक अथर्व पब्लिकेशन ,जळगाव,)यांनी यांनी त्यांनी प्रकाशित केलेल्या “शेवटची लाओग्राफिया”कादंबरीची आवृत्ती संपली असल्याचे सांगीतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन : डॉ. संजय बोरूडे (प्रसिद्ध साहित्यिक)यांनी केले.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख ,आद्य गझल समीक्षक डाँ अविनाश सांगोलेकर ,पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळ प्रमुख डाँ संदीप सांगोले,मसाप पुणे कार्यवाह कवयित्रि अंजली कुलकर्णी ,प्राचार्य शेटें सह महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून बहुसंख्य मान्यवर साहित्यिक रसिक उपस्थित होते आभार साहित्यिक सुरेश कंक यांनी मानले. Publication of the novel “Chimboreyuddha”