कोतळूकवासियांची मागणी, 20 जानेवारी पर्यंतची मुदत
गुहागर, ता.14 : कोतळूक गावाला पूर्णवेळ कायमस्वरुपी वायरमन द्या. अशी मागणी कोतळूकचे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. सचिन ओक यांनी महावितरण उपविभाग, गुहागर कार्यालयाकडे केली आहे. 20 जानेवारी पूर्वी वायरमन नेमणूक न झाल्यास नाईलाजाने लोकशाही मार्गाने 25 जानेवारी 2023 रोजी ग्रामस्थांसमवेत आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल. असा इशाराही सचिन ओक यांनी दिला आहे. Provide permanent wireman to Kotaluk village
श्री. सचिन मुकुंद ओक हे गुहागर तालुका भाजपा सरचिटणीस, कोतळूक ग्रामपंचायत सदस्य व कोतळूकचे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी महावितरण उपविभाग, गुहागरला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोतळूक गावामध्ये गेले अनेक वर्ष कायमस्वरुपी वायरमन नसल्याने सर्व ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या असणारे वायरमन यांचा गावाजवळ संपर्क राहिलेला नाही. चार महसूल गाव असलेल्या कोतळूक गावाची लोकसंख्या 2625 असून 15 वाड्या आहेत. गावामध्ये कायम स्वरुपाचा वायरमन नसल्याने गंजलेले पोल, खाली आलेल्या विद्युत वाहिन्या, विद्युत वाहिन्यांवर वाढलेली झाडी यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वाढत आहेत. विद्युत बिले मात्र ग्रामस्थ वेळोवेळी भरत आहेत. Provide permanent wireman to Kotaluk village

यापूर्वीही कोतळूक ग्रामपंचायतीच्या वतीने वायरमन नेमणूकीसंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतू त्याला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. तरी या गोष्टींचा गांर्भीर्यपूर्वक विचार करून कोतळूक गावासाठी कायमस्वरुपी पूर्णवेळ वायरमन यांची तातडीने नियुक्ती करावी व तशी लेखी माहिती मला मिळावी. तसेच 20 जानेवारी पूर्वी वायरमन नेमणूक न झाल्यास नाईलाजाने लोकशाही मार्गाने 25 जानेवारी 2023 रोजी ग्रामस्थांसमवेत आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल. Provide permanent wireman to Kotaluk village

