विहिंप आणि वारकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गुहागर, ता. 18 : राज्य सरकारने वारीला केलेला विरोध, वारकऱ्यांवर केलेले अत्याचार, बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांना अटक करुन नजरकैदेत ठेवणे या सर्वांचा निषेध करण्याच्या विश्र्व हिंदू परिषद (VHP) आणि वारकरी संप्रदायाने (Varkari) भजनी आंदोलन केले. त्यानंतर निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील वारकरी संप्रदाय आणि विश्र्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी वारीला विरोध करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध केला आहे. साधू संतांची, वारकऱ्यांची होणारी अवहेलना न थांबल्यास एकूण लोकसंख्येच्या 60 टक्के इतका असलेला वारकरी समाज रस्त्यावर उतरेल. महाराष्ट्र व्यापी तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
Warkari and Vishwa Hindu Parishad workers in Ratnagiri district have protested against the state government for opposing Wari. If the contempt of saints and Warakaris is not stopped, the Warakari community, which constitutes 60 per cent of the total population, will take to the streets. There will be intense agitation all over Maharashtra. Such a warning has been given in the statement.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारचा वारी विरोध म्हणजे सरकारने अस्मानी संकटाचा फायदा घेत पोलीस (Maharashtra Police) प्रशासनाच्या बळाने वारकऱ्यांवर जाणीवपूर्वक केलेले अत्याचार आहेत. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना केलेली अटक आणि त्यानंतर फसवून केलेली त्यांची नजरकैद हा त्याचाच एक प्रकार आहे. भर रस्त्यात वारकऱ्यांचे पारंपरिक गणवेश उतरवायला लावणे. हिंदुत्त्वाचे व महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या भागवत धर्मीय पताकांची अवहेलना करणे. निरपराध संतांना अटक करणे, त्यांना अपराध्याची वागणूक देणे. जागोजागी वारकऱ्यांची अडवणूक करणे. त्यांच्यावर प्रशासनिक बडगा दाखवून अत्याचार करणे. हे अत्यंत निषेधार्य आहे. संविधानाने नागरिकांना उपासना करण्याचा अधिकार व स्वातंत्र्य बहाल केलेले आहे. त्यांना कोणीही धक्का लावू शकत नाही. म्हणून विश्र्व हिंदू परिषद व समस्त वारकरी संप्रदायाद्वारे भजनी आंदोलन पुकारण्यात येत आहे.
ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना व जागोजागी अडवणूक केलेल्या सर्व वारकऱ्यांना सन्मानपूर्वक मुक्त करावे. व त्यांच्यावर लावलेले सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावे. आषाढी एकादशी पासून महाराष्ट्रात विविध भागात, विविध मठांमध्ये चालणारे चातुर्मास सेवा व मंदिराती पारंपरिक उत्सव, वारकरी सप्ताह, कीर्तने, प्रवचने, दर्शन यावरील प्रतिबंध दूर करावे. जसे कार्यालयात, बस प्रवासात, थिएटर किंवा हॉटेलमध्ये 50 टक्के उपस्थितीला मान्यता दिली आहे. तशी ह्या अनुष्ठानांना अनुमती द्यावी. मा. मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची तत्काळ माफी मागितली पाहिजे. व या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन मा. मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात सरकारी पूजेसाठी येवू नये.
राज्य सरकारने वारकऱ्यांच्या मागण्यांचा निश्चित निर्णय न घेतल्यास येत्या काळात महाराष्ट्रव्यापी तीव्र आंदोनलनाचा इशारा या आधीच आम्ही राज्यातील विविध ठिकाणी पत्रकार परिषदा घेवून दिलेला आहे. या आंदोलनानंतरही साधू संतांची, वारकऱ्यांची होणारी अवहेलना न थांबल्यास महाराष्ट्राती एकूण लोकसंख्येच्या 60 टक्के इतका असलेला वारकरी समाज संपूर्ण महाराष्ट्रात पंढरपूर पॅटर्न राबविण्यासाठी येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरले. याची कृपया गांभीर्याने नोंद घ्यावी.
हे निवेदन विहींपचे विभाग मंत्री अनिरुद्ध भावे, ह.भ.प. प्रकाश महाराज सोलकर, ह.भ.प. दादा रणदिवे, ह.भ.प. बबन कुंभार, विहींपचे जिल्हा मंत्री विवेक वैद्य यांनी निवासी जिल्हाधिकारी यांचेकडे दिले. यावेळी विहींपचे जिल्हा सहमंत्री वल्लभ केनवडेकर, ॲड. सचिन रेमणे, दीपक जोशी, जिल्ह्यातून आलेले वारकरी व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते भजनी आंदोलनात सहभागी झाले होते.