गुहागर, ता. 21 : गुहागर वासियांची श्रद्धास्थान श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थानच्या नूतन पाषाणमुर्ती पुन: प्रतिष्ठा सोहळ्याला सोमवारी मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. ग्रामदेवता असलेल्या शहर वासियानी छ. शिवाजी महाराज चौक ते श्री व्याघ्रांबरी मंदिरापर्यंत फटाक्यांची आतिषबाजी, रथावर नवीन पाषाणमुर्त्या, महिला आणि पुरुषांनी भगवे फेटे घालून ढोल ताशांच्या गजरात रस्त्यावर ठेका धरला होता. घरचा सोहळा असल्याने सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. सायंकाळी ७ वाजता भव्य मिरवणूक देवीच्या मंदिरात दाखल झाली. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी शहरात मोठी गर्दी झाली होती. Procession of Guhagar Sri Bhairi Vyaghrambri
सोमवारी दुपारी ३.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुहागर ते श्री भैरीव्याघ्रांबरी मंदीर पर्यंत ढोल ताशांचे गजरात नूतन पाषाण मुर्ती तसेच नवीन पालखीची भव्य मिरवणुक काढण्यात आली. रथावर पाषाण मुर्त्या व पालखी बसवण्यात आली होती. बाजूला देवीचे मानकरी होते. शहरातील महिलांनी नऊवारी साड्या नेसून आणि भगवे फेटे घालून ढोल ताशांच्या गजरावर ठेका धरला होता. मध्येच विघ्नहर्ता ढोल ताशा पथकाने रिंगण घालून या सोहळ्यात चार चाँद लावले. काही महिलांनी वारकरी पद्धतीने टाळ घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर काहींनी हातात भगवे ध्वज घेऊन ठेका धरला होता. ठिकठिकाणी या पाषाण मुर्त्यांचे पूजन केले जात होते. Procession of Guhagar Sri Bhairi Vyaghrambri
या सोहळ्यानिमित्त शहरातील रस्ते रांगोळीने सजले होते. शहरातील प्रत्येक वाडी मधील महिला पुरुष या मिरवणुकीत सामील झाले होते. मंगळवार दि. २१ रोजी सकाळी ७.३० वा. विधीयुक्त कार्यक्रमास सुरुवात, प्रधान संकल्प, अग्नी उतारण, जलाधिवास शैया आणि पिठ देवता स्थापना, बुध. दि. २२ रोजी सकाळी ७.३० वा. विधीयुक्त कार्यक्रमास सुरुवात, पिठ देवता हवन, तत्वन्या होम, नुतन मुर्तीचा पुन: प्रतिष्ठा, षोडशोपचार पुजा दुपारी १ वा. अल्पोपहार दुपारी ३ वा. महिलांसाठी हळदीकुंकू, देवतांची पुनःप्रतिष्ठा झालेनंतर भक्तांना देवदर्शन व प्रसाद, सायं. ४ ते रात्रौ ९ वा. पर्यंत स्थानिक भजने होणार आहेत. Procession of Guhagar Sri Bhairi Vyaghrambri