ग्रामविकास मंत्रालयाद्वारे निवड, विविधांगी कामात यशस्वी
गुहागर, ता. 18 : येथील गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांची राज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाने उत्कृष्ट गटविकास अधिकारी म्हणून निवड केली आहे. महिला बचतगट, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास, निसर्ग चक्रीवादळ महापुर अशा नैसर्गिक आपत्तीत केलेले कार्य, पायाभुत सुविधांचा विकास, शेतीमधील प्रयोगांना प्रोत्साहन, विविधांगी कामात प्रशांत राऊत यांनी आपला ठसा उमटविला आहे. Prashant Raut Excellent Group Development Officer

सातारा जिल्ह्यातील पाटणमधील स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथ राऊत यांचे सुपुत्र प्रशांत राऊत यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1998 मध्ये शिक्षकी पेशा स्विकारला. पाटण तालुक्यातच मुळगाव येथे साडेनऊ वर्ष ते शिक्षक म्हणून काम करत होते. त्याच तालुक्यात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणूनही त्यांनी 3.5 वर्ष काम केले. शिक्षक म्हणून काम करतानाच त्यांनी महाराष्ट्र सेवा आयोगाची परीक्षा दिली. या परिक्षेत यशस्वी झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात बालविकास प्रकल्प अधिकारी 3.5 वर्ष काम केले. त्याच जिल्ह्यात खामगांव तालुक्यात गटविकास अधिकारी म्हणून त्यांना बढती मिळाली. 2016 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात 4.5 वर्ष, चिपळूण तालुक्यात 2 वर्ष गटविकास अधिकारी म्हणून काम पाहिले. प्रशांत राऊत यांनी दापोली तालुक्यात निसर्ग वादळात प्रत्यक्ष मदतकार्यात सहभाग घेतला. वादळानंतर ग्रामीण भागातील शेतकरी, बागायतदार यांना शासकीय योजनांद्वारे पुन्हा उभे राहण्यासाठी मदत केली. चिपळूणला आलेल्या महापुरामध्येही अशाच प्रकारचे काम त्यांनी केले. याशिवाय या दोन्ही तालुक्यात मिशन बंधारे हा विचार रुजविण्यात ते यशस्वी झाले. Prashant Raut Excellent Group Development Officer

जून 2022 मध्ये गुहागर तालुक्यात प्रशांत राऊत गटविकास अधिकारी म्हणून बदली होवून आले तेव्हा बचत गटांना बँकांकडून मिळणारे आर्थिक साह्य (बँक लिंकेज) केवळ 7 कोटी रुपये होते. राऊत यांनी महिला बचत गटांबरोबर संवाद साधुन त्यांना अधिक कार्यान्वित करण्याचे धोरण आखले. बँकेकडून 22 कोटीचे आर्थिक साह्य उपलब्ध करुन दिले. बचत गटांच्या उत्पादनांना खरेदीदार मिळावेत म्हणून तहसील प्रशासनाला सोबत घेत गुहागरमध्ये बचत गटांचा मेळावा घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळावे म्हणून गटशिक्षणाधिकारी लिना भागवत यांना सोबत घेत मिशन शिष्यवृत्ती उपक्रम सुरु केला. या उपक्रमामुळे यावर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची संख्या 13 झाली. पुढील वर्षी 25 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. गुहागर तालुक्यात केवळ एक महिला बचतगट गांडुळखताची निर्मिती करत होता. तालुक्यातच गांडुळखताची मागणी जास्त असल्याने प्रशांत राऊत यांनी कौंढर काळसुर आणि खामशेत येथील महिला बचत गटांना गांडुळखत निर्मिती प्रकल्पासाठी प्रोत्साहन दिले. आज हे दोन्ही बचतगट गांडुळखताचे टनावारी उत्पन्न घेत आहेत. हळद लागवडीला प्रोत्साहन म्हणून सलग दोन वर्ष स्पर्धेचे आयोजन पंचायत समिती कृषी विभागातर्फे केले जात आहे. याशिवाय गुहागर पंचायत समितीमध्ये स्वच्छता गृह, रंगरंगोटी, विविध विभागांना संगणक देणे अशा पायाभुत सुविधा देण्याचे कामही त्यांनी केले आहे. Prashant Raut Excellent Group Development Officer

कोकण विभागातील प्रशांत राऊत यांच्या कामाची दखल ग्रामविकास मंत्रालयाने घेत त्यांना उत्कृष्ट गटविकास अधिकारी या पुरस्कारासाठी निवड केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी तालुका जिल्हा पातळीवर प्रशांत राऊत यांना आजपर्यंत कोणताही पुरस्कार मिळालेला नाही. आपल्या पुरस्काराचे श्रेय त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यादव, प्रकल्प संचालक घाणेकर मॅडम व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांना दिले आहे. Prashant Raut Excellent Group Development Officer
