गुहागर, ता. 27 : रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरोधात मोहीम तीव्र केली असून, चिपळूण आणि दापोली येथे केलेल्या कारवाईत गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांचा आकस्मिक मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे व आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. Police action against illegal liquor sales

चिपळूण खांदाट पाली येथील बौद्धवाडीत राहत्या घराच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या संतोष कृष्णा गमरे (वय ५४) याच्यावर चिपळूण पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ९४० रुपये किमतीची ९ लीटर गावठी हातभट्टीची दारू आणि साहित्य जप्त करण्यात आले. आरोपीला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम ३५(३) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे. Police action against illegal liquor sales
तसेच दापोली बुरोंडी बाजारपेठ येथे राहत्या घराच्या बाजूला असलेल्या झोपडीच्या आडोशाला उघड्या जागेत चोरटी दारू विक्री करणाऱ्या केतन कमळाकर केळसकर (वय ३२) याच्यावर दापोली पोलिसांनी कारवाई केली. त्याच्याकडून १० लीटर गावठी दारूसह १,००० रुपये किमतीचा प्लास्टिक कॅन जप्त करण्यात आला. त्यालाही पोलिसांनी कलम ३५(३) नुसार नोटीस दिली आहे. Police action against illegal liquor sales
