गुहागरात ई केवायसी न केलेले 12759 लाभार्थी
गुहागर ता. 06 : पीएम किसान (PM Kisan) ई केवायसी करीता गुहागर तालुक्यातील 122 गावांमध्ये तलाठी, कृषीसहाय्यक व ग्रामसेवकांना कामगिरीवर काढण्यात आले आहे. अजुनही 12759 लाभार्थ्यांची केवायसी प्रलंबीत असून 7 सप्टेंबर पर्यंत ई केवायसी करून घ्यावी. असे आवाहन गुहागर तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी केले आहे. PM Kisan e KYC campaign


गुहागर तालुक्यात पीएम किसानचे एकूण 21298 लाभार्थी आहेत. यातील 8539 लाभार्थीचे पीएम किसानला आधार जोडलेले आहे. यामुळे शिल्लक राहिलेल्या 12759 लाभार्थ्यांची ई केवायसी पूर्ण करुन घेण्यासाठी गुहागर तहसिलच्यावतीने नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी 122 गावांमधील 30 गावे तलाठी यांच्याकडे, 57 गावे कृषीसहाय्यकाकडे, तर 35 गावे ग्रामसेवकांकडे देण्यात आली आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना दिलेल्या गावांप्रमाणे केवायसी न जोडलेल्या लाभार्थ्यांची यादी देण्यात आली आहे. ज्यांचे आधारकार्डला मोबाईल जोडले आहेत ते स्वतच्या मोबाईलव्दारे केवायसी जोडू शकतात. अन्यथा तालुक्यातील ई सेवा केंद्र व सीएससी केंद्रांमध्ये पीएम किसानला आधार जोडणी करावी. यासाठी तालुक्यातील 14 महा ई सेवा केंद्र व 40 सीएससी सेंटर सुट्टीच्या दिवसातही सुरु ठेवण्यात आली आहेत. दोन टप्प्यांमध्ये पीएम किसान यादी अपडेट करण्याचे काम सुरु आहे. लाभार्थ्यांची जमिन डाटाही पाहिला जात आहे. ज्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. ज्यांच्या नावावरच शेतजमिन नाही अशा लाभार्थ्यांची नावे कमी होणार आहेत. PM Kisan e KYC campaign


पीएम किसानमधील 40 टक्के लाभार्थी मुंबईतील आहेत. यामुळे गणेशोत्सवामध्ये गावी आलेल्या मुंबईतील लाभार्थ्यांनी जवळपास महा ई सेवा केंद्र अथवा सीएससी सेंटरमध्ये जावून 7 सप्टेंबर पर्यंत पीएम किसान आधार जोडणी करावी. ज्यांची आधार जोडणी होणार नाही त्यांना पुढील 12 पीएम किसानचा हप्ता जमा होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. PM Kisan e KYC campaign