आमदार भास्कर जाधव, मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विजयी
गुहागर, ता. 17 : माझ्या मतदारसंघातील गुहागर तालुक्यासह खेड आणि चिपळूण भागातील सर्वच्या सर्व ग्रामपंचायती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुरस्कृत पॅनेलने जिंकल्या आहेत. आज महाराष्ट्रात विचित्र प्रकारे जे राजकारण सुरु आहे. त्याला गुहागरच्या जनतेने उत्तर दिले आहे. त्यामुळे मी आनंदी आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते व आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली. People’s Answer to strange politics
आज आमदार भास्कर जाधव गुहागरच्या संपर्क कार्यालयात आले होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार जाधव म्हणाले की, 264 गुहागर विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पॅनेल खुलेआमपणे आम्ही उभे केले होते. या पॅनेलला मतदारांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या पॅनेलने सर्वच्या सर्व निवडणुका जिंकल्या. माझ्या मतदारसंघातील वेलदूर आणि अंजनवेल या दोन मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. पिढ्यान पिढ्या या दोन्ही ग्रामपंचायती भाजपच्या नेतृत्त्वाखाली होत्या. परंतु या वेळेला खुप मोठा चमत्कार हा मतदारांनी घडवला. आमदार भास्कर जाधव आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली आमच्या गावांचा विकास उत्तम प्रकारे सुरु आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींवर त्यांचेच प्रतिनिधी आले पाहिजेत. असा निर्णय सर्व मतदारांनी एकत्र येवून घेतला. म्हणूनच वर्षानुवर्ष भाजपच्या ताब्यात असलेल्या या दोन्ही ग्रामपंचायतींवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा झेंडा फडकला आहे. येथील सर्व मतदारांना मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. वेलदूर आणि अंजनवेलमधील ग्रामस्थांना विश्र्वास देतो की त्यांच्या विकासामध्ये आमदार भास्कर जाधव कुठेही कमी पडणार नाही. People’s Answer to strange politics
या पत्रकार परिषदेपूर्वी वेलदूर ग्रामपंचायत सरपंच म्हणून निवडून आलेल्या दिव्या वणकर आणि अंजनवेल ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून निवडून आलेल्या सोनल मोरे यांचा सत्कार आमदार भास्कर जाधव आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी केला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा ठाकूर यांच्यासह अंजनवेल आणि वेलदूर ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले सर्व सदस्य, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. People’s Answer to strange politics