पत्रकार संघाच्या पुरस्काराचेही होणार वितरण
गुहागर, ता. 13 : गुहागर शहरातील पोलीस परेड मैदानावर प्रथमच पालखी नृत्य स्पर्धा रंगणार आहे. गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वा. जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार संघाच्या दोन पुरस्काराचे वितरण होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष मयूरेश पाटणकर यांनी दिली. Palkhi Dance Competition in Guhagar
रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवानंतर पालखी नृत्य स्पर्धा भरविल्या जातात. गुहागर तालुक्यात याच कालावधीत पालखीचा डोलारा लोटण्याचे कार्यक्रम होतात. त्यामुळे पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन आजपर्यंत झालेले नाही. मात्र गुहागर तालुक्यातील काही गावांतील तरुणांनी पालखी नृत्य शिकुन आपले संघ तयार केले आहेत. आता पालखी नृत्याविषयी तालुकावासीयांमध्ये आकर्षण आहे. हे लक्षात घेवून गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे प्रथमच जिल्हास्तरीय निमंत्रीत संघाच्या पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये तनाळी व शिरवली हे चिपळूण तालुक्यातील दोन संघ सहभागी होणार आहेत. तर मळण, पालपेणे आणि वरवेली हे गुहागर तालुक्यातील तीन संघ सहभागी होणार आहेत. Palkhi Dance Competition in Guhagar


शनिवार, 15 एप्रिल रोजी ही स्पर्धा गुहागर शहरातील पोलीस परेड मैदानावर आयोजीत करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. मंत्र्याच्या उपस्थित गुहागर तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या दोन पुरस्कारांचे वितरण होणार आहे. अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष मयूरेश पाटणकर यांनी दिली. या कार्यक्रमाला गुहागर तालुकावासीयांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले आहे. Palkhi Dance Competition in Guhagar